India Languages, asked by zadevaishu, 9 months ago

वाचन एक उत्तम छंद यावर मराठी निबंध​

Answers

Answered by ItsShree44
11

Answer:

सकाळी घरात वर्तमानपत्र आले की, ते पहिल्यांदा वाचण्यासाठी आम्हा भावंडांची धडपड असते. प्रत्येकाला आपणच ते प्रथम वाचावे असे वाटते. जगाच्या कानाकोपऱ्यांत काय चालले आहे, हे जाणून घेण्याची केवढी ही उत्सुकता ! आपल्याला वाचता आले नसते, तर केवढ्या अगाध ज्ञानाला आपण पारखे झालो असतो! 'वाचाल, तर वाचाल' हे डॉ. आंबेडकरांचे सुवचन किती सार्थ आहे ! वाचनाने आपण बहुश्रुत होतो. वाचन ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे.

मुद्रणकलेच्या शोधापूर्वी माणूस लिहीत-वाचत होता; पण ही संधी फारच थोड्या लोकांना उपलब्ध होती. मुद्रणाच्या शोधानंतर मात्र पूर्वीच्या तुलनेत खूपच लोकांना वाचनाची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे माणसा-माणसाला, समाजा-समाजाला जोडण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागली. जग अधिक जवळ येऊ लागले. ज्ञानाची वेगाने देवाणघेवाण होऊ लागली; ज्ञानाचा प्रसार वाढला व त्यात तितक्याच वेगाने भर पडू लागली. अज्ञानाचे पर्वतच्या पर्वत कोसळू लागले. माणसाने एका नव्या युगात प्रवेश केला. हे नवे युग निर्माण झाले होते ते वाचनामुळे ! लेखक स्वतःचे अनुभव लिहीत असतो. त्यामुळे त्याच्या काळातील जीवनाचे प्रतिबिंब त्याच्या पुस्तकात घडलेले असते. आपण शतकांपूर्वीचा ग्रंथ वाचतो, तेव्हा तत्कालीन जीवनाचे दर्शन घेत असतो. आपण वाचनामुळे भूतकाळात डोकावतो, भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालतो. जगभरच्या माणसांचे अनुभव वाचल्यावर आपल्या लक्षात येते की, जगभर माणूस अंतर्यामी सारखाच आहे. जात, धर्म, पंथ, देश, प्रांत, भाषा ही सर्व वरवरची टरफले आहेत.

आपण कथा, कादंबऱ्या, नाटके, काव्य वाचतो. त्यामुळे आपले खूप मनोरंजन होते. पण वाचनामुळे तेवढाच फायदा होतो, असे नाही. वाचनामुळे आपल्याला हजारो माणसांच्या जीवनाचे दर्शन घडते. माणसाच्या जगण्याच्या हजारो मार्गांचे दर्शन घडते. मनाला प्रगल्भता येते; व्यक्तिमत्त्व संपन्न होते. त्यामुळे वाचणाऱ्याला उन्नत जीवन जगण्याचे मार्गदर्शन घडते. आयुष्यात अनेक संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य मिळते.

वाचनामुळे माणसाची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, संवेदनशक्ती अशा साऱ्या मानसिक शक्तींचा विकास होतो. प्रगल्भ माणूस बनून अत्यंत आनंददायी व उच्च दर्जाचे जीवन जगण्याचे सामर्थ्य आपल्याला वाचनामुळे लाभते.

Similar questions