विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
Answers
Answer:
विज्ञान-शाप की वरदान?' हा माणसाला पावलोपावली पडणारा प्रश्न आहे. विज्ञानाने प्राप्त करून दिलेल्या शेकडो सोयी-सुविधा तो उपभोगत असतो आणि त्याच वेळी वैज्ञानिक शोधांतून ओढवणारे जीवघेणे अपघातही तो अनुभवत असतो. मग त्याला पुन:पुन्हा प्रश्न पडतो की, विज्ञान हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान 'विज्ञान'रूपी ही कामधेनू माणसावर प्रसन्न झाली आणि मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाला चाकाचा शोध लागल्यामुळे माणसाच्या जीवनाला गती आली. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आपल्या सर्व इंद्रियांचे सामर्थ्य वाढवले. सात महासागरांपल्याड पसरलेले जग जवळ आले. इतकेच नाही, तर माणसाने अंतराळात झेप घेतली. समुद्राचा थांग लावला संगणकाच्या साहाय्याने तर माणसाने आजपर्यंत अप्राप्य असणाऱ्या गोष्टी प्राप्त केल्या. इंटरनेटच्या साहाय्याने दूरदूरच्या खंडांत असलेली माणसे एकमेकांना रोज भेटू लागली.
विज्ञानाची ही किमया श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत पोहोचली आहे. अगदी खेड्यातही भाकरीच्या पिठासाठी कुणा अन्नपूर्णेला जाते फिरवावे लागत नाही. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने स्वत:चे कष्ट खूप कमी केले आहेत; तसेच वैदयकीय क्षेत्रात अनेक शोध लावून अनेक असाध्य आजारांवर मात केली आहे. वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांवर मात करता येते. हे। सारे पाहिले की मन ग्वाही देते, विज्ञान हे मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदान आहे. अणुशक्ती ही मानवाला लाभलेली परमशक्ती आहे; पण- त्याच क्षणी या विसाव्या शतकात झालेल्या दोन विध्वंसक महायुद्धांची आठवण येते.
या महायुद्धांत झालेला मानवसंहार पाहिला की विज्ञानाची अवास्तव शक्ती याला कारण आहे, हे प्रकर्षाने जाणवते. गेली पन्नास वर्षे साऱ्या विश्वाला तिसऱ्या महायुद्धाची छाया सतत झाकोळून टाकत आहे. 'तिसरे महायुद्ध' झाले तर सारे विश्व नष्ट होण्याची भीती आहे.
माणसाने आपल्या विज्ञाननिष्ठेने जे काही मिळवले त्यांतूनच माणसाने आपला विनाश ओढवून घेतला आहे, असे म्हणावे लागते. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने भयंकर शस्त्रास्त्रे निर्माण केली, त्यांतून आज दहशतवाद फोफावला आहे. माणसातला माणूस हरवला आहे आणि तो जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालला आहे. माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे तो सुखी झाला आहे का, याबाबत संशयच आहे. हे पाहिले की प्रश्न पडतो, खरोखरच 'विज्ञान शाप आहे की वरदान?'