India Languages, asked by kapaleshivam929, 5 months ago

वृक्ष संवर्धन काळाची गरज मराठी निबंध
in 250 words​

Answers

Answered by harini123455
5

Answer:

वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढय़ांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.

लोकसंख्या विस्फोट, प्रदूषण, जंगलतोड, पर्यावरणाची नासाडी यामुळे पृथ्वीवरील वाढता ताण विचारात घेऊन सन १९९२ मध्ये ‘रिओ दि जानेरो’ येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या जागतिक परिषदेत पृथ्वी वाचविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली व त्या आनुषंगाने काही महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात आले. यावेळी ‘अजेंडा-२१’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या घोषणापत्राने पर्यावरणाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघ आणि देशोदेशीच्या सरकारांच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला. ही शिखर परिषद पार पडून आता जवळपास २५ वर्षाचा काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडत गेली आहे.

जागतिक लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. या प्रचंड लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी पृथ्वी जेवढे देऊ शकते किंवा राखू शकते, त्याहूनही अधिक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आपण करीत आहोत. त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. मानवी कृतीतून उत्सर्जित होणा-या हरितगृह वायूंपैकी ‘कार्बन डायऑक्साइड’ हा सर्वाधिक घातक असा वायू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षात पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे, त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकटय़ा कार्बन डाय-ऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाचे मोठे स्रेत आहेत. आपण ज्या ज्या वेळी वाहनांचा व ऊर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बन डायऑक्साइडची निर्मिती करत आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो.

केवळ खनिज इंधनांद्वारेच जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणा-या वायूंची निर्मिती होते, असे नव्हे, तर आपल्या इतर छोटय़ा-मोठय़ा कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणा-या वायूंची निर्मिती होत असते. जसे की, आपल्याला नको असलेले अन्न जेव्हा आपण फेकून देतो, तेव्हा जमिनीत फेकल्या गेलेल्या अन्नामुळेही जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणा-या वायूची निर्मिती होत असते. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे आजमितीस उत्पादित अन्नाच्या साधारणपणे एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते. या कृतीतून आपण कोणाच्या तरी हक्काच्या अन्नाची नासाडी करतोच. शिवाय अन्नधान्य उत्पादनासाठी वापरली गेलेली जमीन, पाणी, ऊर्जा या संसाधनांचीही एका अर्थाने नासाडीच करत असतो आणि अंतिमत: तापमानवाढीला चालना देत असतो. जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हिमपर्वत व हिमनद्या वितळू लागल्या आहेत आणि त्यांच्या पाण्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरणतज्ज्ञांनी छोटी बेटे आणि समुद्रसपाटीजवळ असलेल्या जगभरातील सर्वच शहरांना धोक्याचा इशारा दिला आहे.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यातही घटच होत आहे. गेल्या २५ वर्षात ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली आहेत. भारताच्या बाबतीत विचार करता, भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. खाणीसाठी रूपांतरीत झालेल्या एकूण वन जमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमिनीवर आज कोळशाच्या खाणी आहेत.

‘भारतीय वन सर्वेक्षण संस्थे’च्या नोंदीनुसार, २००९ ते २०११ या कालावधीत देशात एकंदर ३६७ चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी १.५ ते २.७ टक्के या वेगाने घटत चालली आहेत. अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुस-या बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. सन २००० पासून जगभरात प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी ६५ टक्के मृत्यू आशियात होत आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार जगभरात दरवर्षी ३.२ दशलक्ष मृत्यू प्रदूषणाशी निगडित आजारांनी होत आहेत. शिवाय स्वाईन फ्ल्यूसारखे नवनवीन आजार जगभरात पसरत आहेत.

एकूण सारासार विचार करता पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोटय़ा-छोटय़ा वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उर्त्सजन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते. यातून भारतीय वनसर्वेक्षणाचा इतिहास व त्याचे महत्त्व, भारतीय वनसंपत्तीसमोरील संधी व आव्हाने, तसेच वनशेती किंवा वनीकरणाच्या दृष्टीने आवळा लागवडीचे महत्त्व अधोरेखित होईल, असा आम्हाला विश्वास आहे. पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वनक्षेत्र वाढण्यासाठी सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे.

Similar questions