Venice information in marathi.
Answers
Answer:
इटलीमधील एक इतिहासप्रसिद्ध शहर, सागरी बंदर आणि व्हेनटो-व्हेनेत्सीआ प्रांताची राजधानी. व्हेनिस हे कालवे, कला, वास्तुशिल्प व निसर्गरम्य परिसर यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. लोकसंख्या २,९१,५३१ (१९९८). एड्रिॲटिक समुद्राच्या उत्तर टोकाशी असलेल्या व्हेनिसच्या आखातातील चंद्रकोरीसारख्या खारकच्छ भागातील द्वीपसमूहावर हे वसले आहे. किनाऱ्यापासून चार किमी.वर सागरी भागात एखाद्या जादूनगरीप्रमाणे व्हेनिसचे स्थान आहे. इतिहासकाळात या नगरीने खारकच्छचा ५१ किमी. लांबीचा भाग व्यापला होता. विद्यमान व्हेनिस शहर मात्र खारकच्छच्या संपूर्ण १४५ किमी. लांबीच्या प्रदेशात असणाऱ्या ११८ जलोढीय बेटांवर विस्तारलेले आहे. मूख्य भूमीवरील मेस्त्रे व मारघेरा या दोन औद्योगिक विभागांचाही यात समावेश होतो.
इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरीस उत्तर युरोपकडून इटलीकडे आलेल्या रानटी टोळ्यांपासून बचाव करण्यासाठी या भागातील रहिवाशांनी सुरक्षित वाटलेल्या या बेटांकडे पळ काढला. व्हेनिसचे हेच पहिले वसाहतकार होत. इ. स. ६९७ मध्ये हे वसाहतकार संघटित झाले. व्हेनिसची तत्कालीन अर्थव्यवस्था मासेमारी व व्यापारावर आधारीत होती. नवीन बाजारपेठांच्या शोधार्थ व्हेनिशियन लोकांनी एड्रिॲटिक समुद्राच्या किनाऱ्याने प्रवास केला. नवव्या शतकात त्यांनी व्हेनिस शहराची स्थापना केली. एड्रिॲटिक किनाऱ्यावरील स्थानांमुळे ते एक महत्त्वाचे व्यापारी व सागरी सत्ताकेंद्र बनले. हळूहळू व्हेनिसच्या वसाहती सत्तेचा विस्तार भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील प्रदेशापर्यंत झाला. त्या वेळी व्हेनिसचा व्यापार कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल), इटलीच्या मुख्य भूमीवरील शहरे व आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील शहरे यांच्याशी चालत असे. पुढे व्हेनिसला स्वतंत्र नगरराज्याचा दर्जाही मिळाला. चौथ्या धर्मयुद्धाच्या वेळी (इ. स. १२०२ – ०४) व्हेनिसच्या जहाजांनी धर्मयोद्ध्यांना वाहतूक–सुविधा पुरविल्या होत्या. १३८० मध्ये व्हेनिसने जेनोआचा पराभव केला. त्यामुळे भूमध्य सागरी प्रदेशाच्या पूर्व भागापर्यंतच्या व्यापारावर व्हेनिसने वर्चस्व मिळविले. यूरोपातील सर्वांत मोठ्या शहरांत त्याची गणना होऊ लागली. तसेच युरोप, आशिया यांदरम्यानचे ते एक समृद्ध व्यापारी केंद्र बनले. पंधराव्या शतकात व्हेनिस वैभवाच्या शिखरावर पोहोचले होते. त्याला ‘एड्रिॲटिक सागराची राणी’ (क्वीन ऑफ दि एड्रिॲटिक) असे संबोधले जाई. त्या वेळी या शहराच्या सत्तेखाली क्रीट, डाल्मेशियन किनारा (सांप्रत क्रोएशियाचा भाग) व इटलीच्या ईशान्येकहील काही भागाचा समावेश होता. ११०४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या येथील शस्त्रागाराची पंधराव्या व सोळाव्या शतकांत पुनर्बांधणी करण्यात आली. त्यात जहाजेही बांधली जात.
व्हेनिसच्या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक स्थानाचे काही फायदे व काही तोटेही आहेत. हिवाळी वादळांमुळे येणाऱ्या परांनी येथील रस्ते व इमारतींचे नुकसान होत असते. पाण्यामुळे येथील इमारतींचा पायाही कमकुवत बनत आहे. त्याशिवाय हवेच्या प्रदूषणामुळे इमारती व त्यांच्या दर्शनी भागावरील शिल्पकलेचे फार मोठे नुकसान होत आहे. १९७०च्या दशकाच्या मध्यापर्यंत व्हेनिसमधील बेटे वर्षाला साधारणपणे ५ मिमी.पर्यंत खाली खचत होती. कारखान्यांसाठी केला जाणारा भूमिगत पाण्याचा वापर हे काही अंशी या खचण्याचे कारण असावे, म्हणून इटालियन शासनाने शहर भागातील विहिरींद्वारा केल्या जाणाऱ्या भूमिगत पाण्याच्या वापरावर निर्बंध घातले व त्यामुळे खचण्याची क्रिया थांबल्याचे आढळले. व्हेनिसचे पुरातन कलात्मक वैभव टिकविण्यासाठी जगभरातील अनेकांनी वेगवेगळ्या मोहिमा व उपक्रम सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (यूनेस्को) व्हेनिसचे वैभव जतन करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
व्हेनिसमधील बहुतांश लोक रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. मूळ व्हेनिसमध्ये नव्याने बांधकामास वाव नाही. १९५० पासून हजारो व्हेनिशियन लोकांनी मुख्य भूमीवरील मारघेरा व मेस्त्रे येथे स्थलांतर केले. या ठिकाणी असणाऱ्या रोजगाराच्या संधी, राहणीमानाचा कमी खर्च व आधुनिक इमारतींमध्ये उपलब्ध होणाऱ्या सदनिका यांमुळे हे स्थलांतर झालेले आहे.