या झोपडीत या कवितेचे रसग्रहण करा
Answers
Answer:
कविता-या झोपडीत माझ्या
▪कवी- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
तथा माणिक बंडोजी ठाकूर
▪रचना प्रकार-भजन
▪काव्यसंग्रह- ग्रामगीता
▪मध्यवर्ती कल्पना▪
ग्रामीण जनसमूहाचा विकास व सुस्थितीतील ग्रामजीवन हा संत तुकडोजी महाराजांच्या समग्र रचनांचाच पाया आढळतो.
▪कवीची लेखन वैशिष्ट्य▪
ओघवती रसाळ भाषा व आजूबाजूला आढळणारी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे कवितेला सामान्य लोकांच्या जवळ नेतात. तुकडोजी महाराज संत होतेच पण ते पुरोगामी विचारांचे व जातिभेद, अंधश्रद्धा याविरुध्द समाजाला जागं करणारे समाज सुधारक होते. ग्राम सुधारणा हाच देशसुधारणेचा पाया आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी रचलेले भजन दिल्ली राजघाटावर नियमित म्हटले जाते. त्यांना डाॅ राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली.
▪व्यक्त होणारा स्थायीभाव▪
भौतिक संपन्नता आणि सुख यांचा फारसा संबंध नसतो तर ते आपल्या मनोरचनेवर अवलंबून असते हे त्यांचे मत, आणि ते पटवून सांगणारी ही रचना. आर्थिक सुबत्ता सोयी देऊ शकते पण सुख साधेपणात आहे व त्यातच शांती समाधान मिळते असे त्यांना वाटते.
▪कवितेचे स्पष्टीकरण▪
राजास जी महाली1सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली1 या झोपडीत माझ्या
सर्व सुखसोयीनी युक्त अशा राजमहालात राजाला जे सुख कदाचित मिळते ते मला मात्र या माझ्या निष्कांचन झोपडीत नेहमीच मिळत असते , असे महाराज म्हणतात. ते सुख त्यांना कसे सहजसाध्य आहे ते पुढे वर्णन करतात.
भूमीवरी पडावे1 तार्यांकडे पहावे
प्रभूनाम नित्य गावे1 या झोपडीत माझ्या
तुकडोजी महाराज सांगतात, या माझ्या झोपडीत मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर आडवं पडून ईश्वराने लुटलेलं अगाध सौंदर्य भरभरून न्याहाळता येतं आणि मग त्याच्या नामस्मरणात अपरिमित सुखाचा लाभ होतो.
पहारे आणि तिजोर्या1 त्यातून होती चोर्या
दारास नाही दोर्या1 या झोपडीत माझ्या
राजमहालात मोठमोठ्या तिजोर्या आणि शिवाय कडक पहारे, हे सारं असूनही तिथल्या संपत्तीची चोरी होतेच. पण माझ्या या झोपडीत दाराला साधी दोरीही नाही कारण अशी चोरीला जायला काही संपत्तीच माझ्या कडे नाही. यातून त्यांना असं सुचवायचं आहे की या भौतिक संपत्तीहून मौल्यवान अशी पारमार्थिक संपन्नता माझ्या कडे आहे जी चिरस्थायी आहे.
जाता तया महाला1 'मज्जाव' शब्द आला
भीती न यावयाला1या झोपडीत माझ्या
राजमहालात जे चौकी पहारे असतात त्यामुळे अनेक ठिकाणी आणि अनेकांना बंदी असते. कारण तिथल्या सुविधा सहजसाध्य नसतात. विशिष्ट लोकांच्या साठी राखीव असतात. सर्व सामान्यांना तिथे वावरण्याचे भय असते. तसे माझ्या झोपडीत कसलाही मज्जाव अथवा भीती नाही कारण इथलं सुख शाश्वत आहे.ते कशावरही अवलंबून नाही.
महाली मऊ बिछाने1 कंदिल शामदाने
आम्हा जमीन माने1 या झोपडीत माझ्या
महालामधे अनेक प्रकारच्या सुखसुविधा असतात पण आम्हा सामान्यांना आहे त्या परिस्थितीतच समाधान मिळते असे त्यांना वाटते.
येता तरी सुखे या1 जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा1 या झोपडीत माझ्या
येणार्यांचं स्वागत आहे आणि जाणार्यांना बंधन नाही, हे केवळ लोकांच्या नव्हे तर परिस्थितीच्या बाबतही ते म्हणत असावेत. कारण त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे परिस्थितीच्या अनुकूल प्रतिकूलतेचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही , हेच त्यांना सुचवायचे आहे.
पाहून सौख्य माझे1 देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे1 या झोपडीत माझ्या
तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या झोपडीतली शांती किंवा सौख्य प्रत्यक्ष देवेंद्राला लाजवेल इतके भरभरून आहे. म्हणजेच स्वर्गातल्या सुखाइतकेच किंवा त्याहूनही अधिक ते शाश्वत आहे. कारण ते बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नाही तर मनाच्या स्थितीवर टिकलेले आहे.
▪आवडलेली ओळ▪
'भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे ' या काव्यपंक्तीत असलेली कल्पनाच इतकी मोहक आणि सुखकारक आहे की जणू आपण त्याचा अनुभवच घेतो आहोत.
▪न आवडलेली ओळ▪
न आवडण्यासारखा कोणताच विचार नाही.
▪भाषिक सौंदर्य▪
अतिशय साधी, सर्व सामान्यांना आपलीशी वाटणारी व ग्रामजीवनाशी जवळीक साधणारी कवितेतली भाषा आहे.
▪काव्य सौंदर्य▪
अतिशय साध्या, सामान्यांच्या दैनंदिन जगण्यातलं सौंदर्य कवितेच्या माध्यमातून स्पष्ट होतं.
▪आशय सौंदर्य▪
बहुसंख्य लोकांच्या आर्थिक मागासलेपणाच्या दुःखाला सहजपणे बाजूला सारून शाश्वत सुखाची महती यात दिसून येते. चिरंतन सुखाचा राजमार्गच संत तुकडोजी महाराज आपल्याला खुला करतात.
Answer:
अछा है बहुत ख़ास है.