Yadavanchya kalat Maharashtrat kontya sampradayacha uoday zala
Answers
यादव काळात विद्यांच्या व शास्त्रांच्या अध्ययनास उत्तेजन मिळाले. खानदेशात पाटण, कर्नाटकात सोलोटगी, मराठवाड्यात पैठण येथे विविध विद्यांच्या व शास्त्रांच्या अध्ययनांची विद्यापीठे होती. भास्कराचार्यांचा नातू आणि सिंघणाच्या दरबाराचा ज्योतिषी चांगदेव याने चाळीसगावानजीक पाटण येथे चालविलेल्या ज्योतिषशास्त्राच्या पाठशाळेचा कोरीव लेखात निर्देश आहे. त्याकाळी धर्मशास्त्र, पूर्वमीमांसा, न्याय, वेदान्त इत्यादिकांवर बरीच ग्रंथरचना झाली. अपरार्काची याज्ञवल्क्य स्मृतीवरील अपरार्का टीका, हेमाद्रीचा चतुर्वर्ग-चिंतामणि, बोपदेवाचे मुक्ताफल हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. बोपदेवाने मुग्धबोध नामक संस्कृत भाषेचे सुबोध व्याकरण लिहिले. त्याचा प्रचार अद्यापि बंगालात आहे. मुक्ताफला वरील हेमाद्रीच्या टीकेत बोपदेवाच्या ग्रंथांची संख्या पुढीलप्रमाणे दिली आहे. व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, तिथिनिर्णयावर एक, अलंकारावर तीन आणि भागवत धर्मावर तीन असे ग्रंथ बोपदेवाने लिहिले होते. त्यांपैकी सध्या आठ उपलब्ध आहेत. बोपदेव हा सध्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या काठी सार्थ गावाचा रहिवासी होता. पुढे तो हेमाद्रीच्या आश्रयास आला.
महानुभाव पंथाचे प्रमुख संस्थापक श्री चक्रधर यांनी आपला उपदेश मराठीत केल्यामुळे त्यांच्या पंथायांनी मराठीत ग्रंथरचना केली. हे मराठीतले आद्य ग्रंथ होत. मुकुंदराजाचे विवेकसिंधु व परमामृत आणि ज्ञानदेवांची भावार्थदीपिका नामक गीतेवरील टीका हे त्या काळचे वेदान्तविषयक मराठी ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.
यादवकालीन कला मुख्यत्वे त्यांच्या वास्तुशिल्पशैलीतून दृग्गोचर होते. या काळी एक विशिष्ट स्थापत्य पद्धती (ज्यामधे चुन्याचा वापर अजिबात नाही) प्रचारात आली तिला यादवांचा मंत्री हेमाद्री किंवा हेमाडपंत (तेरावे शतक) याच्या नावावरून हेमाडपंती हे नावरूढ झाले. हेमाडपंत हा महादेव यादव आणि रामदेवराव यादव ह्यांचा श्रीकरणाधिप होता. त्याने चतुर्वर्गचिंतामणि सारखा धर्मशास्त्रकोश आणि इतर अनेक ग्रंथ लिहिल्याचे उल्लेख मिळतात. त्याने अनेक नवी मंदिरे बांधली आणि जुन्याचा जीर्णोद्धार केला. त्याने सु. तीनशे मंदिरे बांधण्यास उत्तेजन दिले होते, अशी वदंता आहे. त्यामुळे या तत्कालीन मदिरांना ‘हेमाडपंती’ ही संज्ञा रूढ झाली असावी तथापि अशा पद्धतीने बांधलेल्या मंदिरांतील काही मंदिरे हेमाद्रीपूर्वी शंभरसव्वाशे वर्षे आधी बांधल्याचे पुरावे मिळतात. त्यामुळे या सर्व मंदिरांना हेमाडपंती म्हणणे कालदृष्ट्या अप्रस्तुत व चुकीचे ठरेल. याकरिता ही अपसंज्ञा बाजूला ठेऊन त्यांना ‘यादव मंदिरे’ म्हणणे संयुक्तिक होईल.