(4) भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे?
Answers
Answer:
ब्राझीलचा कार्निव्हल जगप्रसिध्द आहे. त्यामध्ये सांबा नृत्य आणि संगीत याचा आस्वाद घेण्यासाठी बरेच पर्यटक ब्राझीलला भेट देतात. पोर्तुगीज भाषेमुळे ब्राझीलकरांना आपला गोवा जास्त जवळचा वाटतो. गोव्यातही पोर्तुगीज राजवट होती त्यामुळे गोव्यात अनेकांना पोर्तुगीज भाषा नीट बोलता येते.
रोझीमार डा सिल्वा सुझानो या मुंबईतील ब्राझीलच्या कॉन्सल जनरल असून त्या अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आहेत. त्यांच्या बरोबर भारत आणि ब्राझील यांच्यातील संबंधाबाबत तसेच ब्रिक्स संघटनेबाबत अत्यंत मनमोकळी चर्चा झाली.
भारत आणि ब्राझील यांच्यामधे पर्यटन वाढीबाबत सविस्तर चर्चा झाली. ब्राझीलमध्ये रिओ डी जानिरो हे सर्वात महत्वाचे शहर असून राजधानी ब्राझीलिया आहे. आपले अहमदाबाद आणि गांधीनगर या सारखीच ही शहरे आहेत. परंतु गांधीनगर पेक्षा ब्राझीलिया हे आखीव-रेखीव आणि सुंदर शहर आहे. ब्राझीलियातील इमारती पहाण्यासाठी अनेक पर्यटक तेथे आवर्जून जातात. कोपाकबाना आणि इपानेमा हे समुद्र किनारे तसेच ख्रिस्त द रिडीमीर हा ३८ मीटर उंचीचा डोंगराच्या शिखरावर असलेला पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सावो पावलो हे ब्राझील मधील महत्वाचे दुसरे शहर आहे. आर्थिक घडामोडींसाठी व उद्योगांसाठी ते प्रसिध्द आहे. अमेझॉन नदीचे खोरे व ब्राझील-अर्जेंटीना सीमेवर असलेला इग्वासू धबधबा हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. ब्राझील मध्ये अनेक मोठी जंगले आहेत. तसेच विविध तऱ्हेचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती ब्राझील मधील विविधतेला अधिक श्रीमंत करतात.
भारतीय लोक अमेरिकेपर्यंत जातात परंतु तुलनात्मकदृष्टया जवळ असलेल्या ब्राझीलला भेट देत नाहीत व ही परिस्थिती सुधारली पाहिजे असे श्रीमती सुझानो यांचे मत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे.
ब्राझील हा लॅटीन अमेरिका आणि कॅरेबियन विभागातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी सहकारी आहे. ब्रिक्स संघटनेच्या स्थापनेनंतर ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय सुमारे ९०० टक्क्यांनी वाढल्याचे सुझानो यांनी सांगितले. २०१६ साली भारताने ब्राझीलला २.४८ बिलियन अमेरिकी डॉलर्स किंमतीच्या वस्तू निर्यात केल्या. तर ब्राझीलकडून ३.१६ बिलियन अमेरिकी डॉलर्स किंमतीच्या वस्तू आयात केल्या. यातील बॅलन्स ऑफ ट्रेड ब्राझीलच्या पारड्यात जातो. भारत हा ब्राझीलला निर्यात करणारा ब्राझीलच्या दृष्टीकोनातून १२वा मोठा देश आहे तर ब्राझीलमधून वस्तूंचे आयात करणारा ११वा मोठा देश आहे. भारत ब्राझीलला रसायने, औषधे, अभियांत्रिकी वस्तू, कापड आणि तयार कपडे इत्यादी वस्तू निर्यात करतो तर ब्राझीलकडून क्रुड ऑईल, साखर (ब्राझील हा भारताप्रमाणे मोठा ऊस उत्पादक देश आहे). सोया ऑईल, तांबे, लोह खनिज इत्यादी वस्तू आयात करतो.
अनेक ब्राझीलियन कंपन्यांनी भारतामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ती प्रामुख्याने वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, खाण उद्योग, उर्जा, जैविक तेले (बायो फ्युअल्स) आणि पादत्राणे उद्योगात आहे. भारतीय कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञान, औषधे निर्माण, ऊर्जा, शेती, खाण उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, वाहन उद्योग इत्यादी क्षेत्रात ब्राझीलमध्ये गुंतवणूक केली आहे.
टी. सी. एस., विप्रो, आदित्य बिर्ला समूह, इन्फोसिस, कॅडीला रेणुका शुगर्स, भारतातील प्रसिध्द कंपन्या युनायटेड फॉस्फरस, लुपिन फॉर्मास्युटीकल्स, पोलारीस, ओ. एन. जी. सी., सुझलॉन, प्रिकोल इत्यादी भारतीय कंपन्यांच्या ब्राझीलमधे शाखा आहेत व त्या पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. एका अंदाजानुसार भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधे पाच बिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारतामध्ये ब्राझीलच्या मार्को पोलो (वाहन उद्योग) व्हेल (खाण उद्योग) स्टेफनीनी (माहिती तंत्रज्ञान), गेर्दाऊ (पोलाद) या सारख्या सुमारे बारा मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. भारताच्या ब्राझीलमधे सुमारे पंचावन्न कंपन्या कार्यरत आहेत.
श्रीमती सुझानो यांनी एक गोष्ट ठळकपणे नमूद केली की भारतीय उद्योजकांना ब्राझीलमधे प्रचंड संधी आहे. भारतीय उपखंडातून त्यांच्या फक्त मुंबई कार्यालयात उद्योजकांचे रोज सुमारे पन्नास व्हिसाकरीता अर्ज येतात. भारतीयांना ब्राझीलमधे भारतीय उपहारगृहे तसेच खाण उद्योग यामधे खास करून बॉक्साईट आणि तांबे, उर्जा यामधे सोलर तसेच विंड एनर्जी व बायो पॉवर इत्यादी क्षेत्रात उत्तम संधी आहे. ही संधी ब्राझील सरकारने खुले धोरण स्विकारल्यामुळे अधिक सोपी आहे. ब्राझीलमधे उत्तम दर्जाचे पाचू मिळतात. भारताची ब्राझीलमधे ब्राझीलच्या भारताच्या गुंतवणुकीपेक्षा पाचपट अधिक गुंतवणुक आहे. शेती तंत्रज्ञानावर ब्राझीलने मोठे लक्ष केंद्रीत केले आहे. शेती आधुनिक आणि अत्यंत फायदेशीर कशी होईल याकडे त्यांची EMBRAPA ही संस्था बारकाईने लक्ष देते व बऱ्याच प्रमाणात शेती उद्योगाचे नियंत्रणही करते. जैविक तंत्रज्ञानावर त्यांच्या देशात मोठे संशोधन चालू आहे. भारतीय शेती संस्थांबरोबर, अनेक ब्राझीलियन संस्थांचे संशोधन चालू आहे. वर्षाला सुमारे पंचवीस भारतीय विद्यार्थी शिष्यवृत्तीवर ब्राझीलमधे संशोधनासाठी जातात.
ब्राझीलने आता ब्राझीलला भेट देणारे उद्योजक व वारंवार भेटी देणारे पर्यटक यांच्यासाठी पाच वर्षाचा व्हिसा देण्याची सोय केली आहे. एकूणच भारतीय उद्योजकांना ब्राझीलमधे उद्योग सुरू करण्यास सध्याचा काळ ही अतिशय योग्य वेळ आहे. मग कधी सुरू करताय उद्योग ब्राझीलमधे