Aatma vrutta on this topic one eassy in marathi
Answers
Answer:
“अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा”, दोन तासांच्या मधल्या वेळात आम्ही सगळे जण दंगा-मस्ती करत होतो तेंव्हा अचानक आवाज आला. “ऑ.. हे कोणं बोलले?” आम्ही इकडे तिकडे बघु लागलो. हे वाक्य तर समोरच्या फळ्यावर ‘आजचा सुविचार’ म्हणुन लिहीले होते. पुन्हा तोच आवाज आला आणि लक्षात आलं की दुसरं तिसरं कोणी नाही तर चक्क वर्गातील फळा बोलत आहे.
हो मुलांनो, मी फळाच बोलतो आहे, पुन्हा तोच आवाज आला. आज तुम्ही माझ्या अंगावर हा जो सुविचार लिहीला आहे तो खुप आवडला आणि विचार केला तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात. तुमची दहावीची परीक्षा तोंडावर आली आहे. वर्षभर तुम्ही खच्चुन अभ्यास केला आहे आणि त्याचे फळ तुम्हा सर्वांना यश्याच्या रुपाने मिळेलच. पण म्हणतात ना ‘अपयश ही यश्याची पहीली पायरी आहे’ ते अगदी खरं आहे बरंका. तेंव्हा जर अपयश पदरी पडलं तरी त्याने खचून जाऊ नका, उलट अधीक जिद्दी व्हा, अधीक अभ्यास करा आणि मग यश हे तुमचेच आहे.
मुलांनो, आज वर अनेक पिढ्या माझ्या समोरुन गेल्या. माझ्या अंगावर इतिहास, भुगोल, गणित, विज्ञान असे अनेक विषयांचे पाठ शिकवले गेले. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या निमीत्ताने तुम्ही मुलांनी चितारलेल्या चित्रांनी, कवितांनी, देशप्रेमी विचारांनी माझे अंग अंग रोमांचीत झाले, तर सरस्वतीच्या पुजनाने, गुरु-पुजनाच्या दिवशी, शिक्षक-दिनाच्या दिवशी तुमच्या कोमल हातांच्या स्पर्शाने मी अधीक उल्हासीत होत गेलो. कधी अधीक तासांमुळे तुमचे कोमेजलेले चेहरे बघीतले तर कधी रिक्त तासांमुळे काय-करु आणि काय नको झाल्यानंतरचे तुमचे प्रफुल्लीत चेहरे सुध्दा पाहीले. कधी तुमच्या शिक्षकांच्या तर कधी प्रश्न सोडवण्याच्या निमीत्ताने तुमच्यापैकीच काहींनी माझ्या अंगावर लिहिलेल्या टपोऱ्या मोत्यासारख्या अक्षरांनी माझ्या अंगावर साज चढवला तर कधी मोडक्या तोडक्या उंदराच्या शेपटिसारख्या काढलेल्या अक्षरांनी माझ्या मनाला गुदगुल्या केल्या.
पुढच्या रांगेत बसणाऱ्या अभ्यासप्रेमी मुलांची विद्येतील आसक्ती ही मी पाहीली आणि मागच्या बाकांवर बसुन खट्याळपणा करणाऱ्या टग्यांची मस्ती सुध्दा. तुम्ही सर्व माझ्या दृष्टीने सारखेच. कोण ‘हुशार’ कोण ‘ढ’ हा भेदभाव माझ्या लेखी नाहीच. माझ्या लेखी तुम्ही सर्व फक्त विद्यार्थीच. मला ना खरंच तुमच्या सर्वांचे, तुमच्या कोमल, सुजाण, सृजन मनाचे कौतुक वाटते. कित्तेक वर्ष प्रत्येक जण काही ना काही तरी, वेग-वेगळ्या विषयावर माझ्या अंगावर खरडतं आलाय. हे लिहीलेले कधी तासाभरात पुसले जाते तर कधी दिवसा-दोन दिवसात. पण तुमचे कोवळे मन ती प्रत्येक गोष्ट कळत-नकळत पणे टिपत असते. ती तुमच्या मनाच्या फळ्यावर कायमची कोरली जाते.
‘विद्या सर्वार्थ साधनंम’ हे सर्वार्थाने खरं आहे. विद्या हे असे अमुल्य धन आहे जे ना कुठला चोर चोरू शकतो ना त्याची भावा-भावांमध्ये वाटणी होऊ शकते. विद्या हे असे धन आहे जे दिल्याने वाढतचं जाते. जो विद्येचा धनी आहे त्यालाच जगामध्ये विद्वान म्हणुन संबोधले जाते. विद्येमुळेच मानवाला आपलं चांगलं काय, वाईट काय हे योग्यपणे पारखण्याची जाणीव होते. तुम्ही विद्या मिळवा, जगातली सगळी भौतीक सुखं तुमच्या पायाशी लोळण घेतील.
चला तर मग मुलांनो, तुमचा पुढचा तास सुरु व्हायची वेळ झाली. पुढचे शिक्षक वर्गात यायच्या आधीच मी गप्प होतो कसा!
खुप खुप शिका, खुप खुप मोठ्ठे व्हा आणि आपल्या मनाच्या फळ्याचा थोडातरी भाग कायम नविन नविन गोष्टी नोंदण्यासाठी रिकामा ठेवा.