अतिवृष्टी, महापुराचे थैमान मराठी, निबंध, भाषण, लेख
Answers
अतिवृष्टी व महापुराचे थैमान
अतिवृष्टी म्हणजे जोरदार पाऊस. अशा जोरदार आणि जास्त प्रमाणाचा पाऊस पडल्यामुळे जर पाणी साचले आणि लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला महापूर म्हणतात. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे.
दर वर्षी कोकणात भरपूर पाऊस पडतो. ह्या गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि रोहा शहरात पावसाने महापुरासह थैमान घातले. सुरवातीला जोरात पावसाला सुरवात झाली पण नेहमी पावसाची सवय असलेल्या रोहेकरांना काही नवीन वाटले नाही. रात्र भर पाऊस पडला आणि कुंडलिका नदीला भरती आली. सकाळी पहिले तर नदीचा पूल बुडून गेला होता आणि काही दुकानांमध्ये पाणी भरले होते. रस्त्यावर सुद्धा पाणी भरले होते आणि पाऊस वाढत चालला होता. ज्यांचा घरात पाणी भरले त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
ह्या महापुरात खूप नुकसान झाले. गायी म्हशी वाहून गेल्या. वाहने वाहून गेली. सुदैवाने जिवीत हानि झाली नाही तरी मालमत्तेचे भरपूर नुकसान झाले.
Answer:
गायत्री नदी ही आमच्या गावाचे भूषण. किंबहुना गायत्रीच्या काठावरच आमचे गाव वसलेले आहे. गावाच्या बाबतीत कोणतीही गोष्ट सांगायची असली, तर ती गायत्रीच्या संदर्भात सांगितली जाते. गावातल्या प्रत्येकाचे गायत्रीवर खूप प्रेम ! अशी ही गायत्री कधी आपल्या जीवावर उठेल, असे गावकऱ्यांना वाटलेच नव्हते. पण ते अघटित घडले ! नदीला महापूर आला आणि दीड दिवस महापुराने गावात अगदी थैमान घातले !
त्या वर्षी सगळीकडे पावसाचे प्रमाण जरा जास्तच झाले होते. आमच्या गावातही पाऊस बराच काळ मुक्काम ठोकून होता. नुसताच रेंगाळला नव्हता तर तो चक्क कोसळत होता. जुनी जाणती माणसे म्हणत होती - असा पाऊस कधीच पडला नाही ! दरवर्षी पावसाळ्यात गायत्रीचे पाणी वाढू लागले की, गावातील गृहिणींना आनंद होतो. त्या कौतुकाने म्हणतात, चला, आपली 'गायी' माहेराला आली आहे. तिची ओटी भरू या. तिचे कोडकौतुक करू या." मग सगळ्या स्त्रिया नदीच्या घाटावर जमून तिची ओटी भरतात. तिला खण नारळ अर्पण करतात.
यंदापण गावातील सर्व महिला नदीच्या काठावर जमल्या; पण यंदाचे तिचे स्वरूप मात्र वेगळेच होते. नेहमीची सोज्ज्वळ, शांत गायत्री नव्हती. तर तिने रौद्ररूप धारण केले होते ! 'हे काही तरी वेगळेच लक्षण आहे बाई !' कसेबसे ओटीभरण उरकले आणि सगळ्या महिला घराकडे वळल्या. पाऊस कोसळतच होता आणि सर्वांचे चित्त होते गायत्रीकडे. बातम्या येत होत्याच. गायत्रीचे पाणी वाढत होते. नदीकाठावरचे गणेशाचे देऊळ पूर्ण पाण्याखाली गेले.
तेव्हा मात्र गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले ! पाऊस सतत पडतच होता आणि त्याचबरोबर नदीचे पाणी वाढत होते. मग लक्षात आले की, प्रक्षुब्ध झालेल्या नदीने गावाला सगळ्या बाजूने वेढले आहे. गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्कच राहिला नव्हता. सगळेच गावकरी हवालदिल झाले होते. कशी शांत होणार ही नदी? मग अफवांचे पेव फुटले. खोलगट भागातील बैठी घरे, झोपडीवजा घरे पाण्याखाली गेली. कित्येकांची गुरे, कोंबड्या वगैरे पाण्यात वाहून गेले ! तासातासाला पाणी वाढतच होते. निम्मा गाव पाण्याखाली होता. कित्येक झाडे उन्मळून पडली. शेतात पाणीच पाणी झाले होते. घराघरातील सर्व माणसे आपला जीव वाचवण्याचा यत्न करत होती. अशा संकटाच्या वेळी काही व्यक्तींच्या मनातील धाडस आपोआपच जागे होते. ते इतरांना साहाय्य करायला धावतात. गावाजवळच्या एका टेकडीवर गावातील बायकामुलांना पोहोचवले गेले. आता रस्ते हरवले होते. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी काही हौशी लोकांनी होड्या आणल्या होत्या. गावात नुकत्याच आलेल्या नव्या जिल्हाधिकारी बाईंनी होडीतून गावात फेरफटका मारला व गावकऱ्यांना धीर दिला.
पाऊस कोसळतच होता. आता पाण्याशिवाय काहीही दिसत नव्हते. किती नुकसान झाले असावे, याचा अंदाज लोक बांधत होते, त्याचबरोबर देवाला आळवत होते. 'थांबव रे बाबा तुझा पाऊस !' बऱ्याच काळानंतर पाऊस थांबला ! पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले; पण भरपूर नुकसान करून आणि रोगराई पसरवून ! गावकरी अजूनही या महापुराच्या आठवणीने हवालदिल होतात आणि देवाला हात जोडून विनवणी करतात, 'देवा, हे असले महासंकट पुन्हा आणू नको रे बाबा !