भुकंपमापन यंत्र टीपा लिहा
Answers
Answer:
कंपाचे मापन करणाऱ्या यंत्रास भूकंपमापक (seismograph) म्हणतात. याचा शब्दश: अर्थ भूकंपाचे चित्रण करणारा असे आहे. हे यंत्र भूकंपाचे मापन करते, म्हणजेच भूकंपाच्या लहरींचे चित्रण करते. या यंत्रात जमिनीवर एक ठोकळा घट्ट बसवण्यात आलेला असतो. त्यावर एक घड्याळ, कागदाची गुंडाळी व लेखणी बसवलेला एक लंबक अशा गोष्टी असतात. लेखणी ही कागदाच्या रूंदीच्या मध्यभागी ठेवलेली असते. सर्व काही आलबेल असताना घड्याळ सुरू असते व कागदाची गुंडाळीही फिरत (रोलिंग) असते. तेव्हा कागदाच्या मध्यभागी सरळ अशी रेष चित्रीत होत राहते. भूकंप झाल्यावर सर्व यंत्र हलते. मात्र. लंबक हा त्याच्या जडत्वामुळे (inertia) स्थिर राहतो. त्यावर बसवलेल्या लेखणीमुळे कागदावर विविध आकाराच्या रेषा उमटायला सुरुवात होते. या रेषांचे कागदाच्या मध्यापासूनच्या अंतराला अॅप्लिट्यूड (amplitude) म्हणतात. याच अॅप्लिट्यूडचा उपयोग भूकंपाची तीव्रता काढण्यासाठी होतो.
भूकंपाची तीव्रता ही प्रामुख्याने ‘रिश्टर स्केल’ (Richter scale) या एककात मापली जाते. त्यामुळे आधी त्याची माहिती घेऊ. भूकंपमापकावर चित्रीत झालेल्या भूकंपलहरींच्या सर्वात जास्त अॅप्लिट्यूडच्या एककाचे लघुगणक एककात (Logarithmic scale) रूपांतर करून रिश्टर स्केलमधील तीव्रता काढली जाते. या रिश्टर स्केलचे एक ते दहा असे गट पडतात. एका गटातील भूकंप हा त्याच्या आधीच्या गटातील भूकंपापेक्षा दहापट अधिक शक्तिशाली असतो. या गटांमधील एकच्या पातळीतील भूकंप हा सर्वात कमी तीव्रतेचा असून आपणास तो जाणवतही नाही, (असे भूकंप एका वर्षात हजारो लाखो होतात) तर दहा या पातळीचा भूकंप हा महासंहारक असून याची एकही नोंद पृथ्वीच्या ज्ञात इतिहासात नाही. आता रिश्टर स्केलसोबतच मर्केली स्केलही अस्तित्वात आहे.
तर, भूकंपाचे मापन कसे करतात? हे आपण पाहिले. मात्र, नुसते मापन करून भूकंपाचे परिणाम कमी होत नाहीत. भूकंपाचे परिणाम, म्हणजेच बळींची संख्या, आर्थिक नुकसान, इ. हे कमी करण्यासाठी बरेच संशोधन चालू आहे. त्याची थोडक्यात माहिती बघू.
1. भूकंपरोधी बांधकाम (Earthquake Resistant structure) या प्रकारात एखाद्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता गृहीत धरून बांधकाम करतानाच स्वत:च्या (self) व चलित (live ) वजनाबरोबर भूकंपाचाही दाब सहन करू शकेल, असे बांधकाम करतात. अख्खे बांधकाम शक्यतो एकाचवेळी उभे (Erect) करावे. त्यामुळे त्याची एकसंधता (Homogenerity) कायम राहते. तसेच सांध्यांचे मजबूतीकरणदेखील आवश्यक आहे, कारण सांधे हा कोणत्याही बांधकामातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. याशिवाय पाया (Foundation) भरताना वेगवेगळे फुटिंग भरण्यापेक्षा सगळा पाया हा राफ्ट प्रकारच्या फुटिंग वर भरावा. त्यामुळे भूकंपात पायाची हालचाल झालीच, तरी ती वेगवेगळी न होता एकत्र होते व त्याची एकसंधता ब ऱ्यापैकी कायम राहते.
2. चांगली डागडुजी व दुरुस्ती-इमारतींची वेळोवेळी डागडुजी करत राहिल्यास भूकंपात न पडता उभी राहायची तिची क्षमता वाढते. भूकंपात सापडलेली इमारत दुरुस्त करायची असल्यास रचना अभियंत्याकडून (structural Engineer) तिची पाहणी (Audit) करवावी व ते सांगतील तसे करावे. एखादा खांब दुरुस्तीच्या पलीकडे (Beyond Repair) खराब झाल्यास त्याला जोडून दुसरा खांब उभा करता येऊ शकतो. तसेच खांबांना बाहेरून स्टील व काँक्रीट वापरून त्याची मजबूती वाढवता येते. त्याला जॅकेटिंग असे म्हणतात. रेट्रोफिटिंगही करता येऊ शकते.
3. भूकंपाचे अनुमान (Prediction of earthquake)-भारतासारख्या विकसनशील देशामध्ये भूकंपप्रवण क्षेत्रातील सर्व बांधकामे भूकंपरोधी करणे जवळजवळ अशक्य आहे, तसेच अगदी विकसित देशामध्येदेखील हे चांगलेच खर्चिक आहे. त्यामुळे जीवितहानी कमी करण्यासाठी भूकंपाची आगाऊ सूचना देण्याचे तंत्रज्ञान आल्यास ते समाजासाठी फारच फायद्याचे होऊ शकते. भूकंपाचे आगाऊ अनुमान काढणे, या विषयात सध्या बरेच संशोधन चालू आहे. या अनुमानाचे दोन प्रकार पडतात- 1. अल्पकालीन अनुमान (Short Term predition) व 2. दीर्घकालीन अनुमान (Long Term Predition).
अ. अल्पकालीन अनुमानात भूकंप होण्याच्या थोड्याच कालावधीच्या आधी त्याची सूचना दिली जाते. हे अनुमान अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण याच अनुमानावरून आपत्कालीन सेवांना परिस्थिती नियंत्रणात ठेऊन जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे व त्यांच्या इतर गरजा (अन्न, निवारा, वैद्यकीय) पूर्ण करणे शक्य होते. हे अनुमान चुकल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. लोकांना कामे टाकून जावे लागल्याने अनुमानात चूक झाल्यास लोकांचा या तंत्रज्ञानावरचा विश्वासच उडू शकतो. सर्व कामे थांबल्याने खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच गडबडीचा फायदा घेऊन समाजकंटकही मोठे नुकसान करू शकतात.
आ. दीर्घकालीन अनुमानात फार पुढील म्हणजे अनेक वर्षांपुढील भूकंपाचेदेखील अनुमान करता येते. हे अनुमान पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींवरून काढले जाते व अगदीच ढोबळ असते. हे अनुमान फार अचूक नसले तरी चालते, कारण याचे तत्काळ परिणाम होत नाहीत. यात एखाद्या ठिकाणी अथवा एखाद्या वेळी भूकंप होईलच असे सांगितले जात नाही, तर त्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते.
इ. भूकंपलहरींवरून अनुमान - याच लेखात लिहिल्याप्रमाणे, भूकंपलहरी या भूकंपाच्या उगमस्थानापासून सुरू होतात व कालांतराने पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक ठिकाणी पोहोचतात. या लहरी त्या भागांत पोहोचण्यापूर्वीच त्यांचा विस्तार व तीव्रता समजल्यास त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देऊन जीव तरी वाचायची शक्यता निर्माण होते. हीच पद्धत त्सुनामींपासून बचावासाठीही वापरता येते व जास्त उपयुक्त ठरू शकते. कारण त्सुनामी लाटेचा वेग हा भूकंपलहरींपेक्षा बराच हळू असतो.असे जरी असले, तरी भूकंपाचे अनुमान काढण्याचे तंत्रज्ञान अजूनही बाल्यावस्थेतच आहे. यात संशोधनाला खूप वाव आहे.
पुढील लेखात आपण भारतातील भूकंपांचे वितरण तसेच जगातील काही कुप्रसिद्ध भूकंपांची उदाहरणे बघूया