एक थोर विचारवंत – महर्षी अण्णासाहेब धोंडो केशव कर्वे मराठी...
Answers
Answer:
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म महाराष्ट्रामधील,रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली गावात १८ एप्रिल,१८५८ रोजी झाला.ते एक श्रेष्ठ समाजसुधारक होते.ते महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावाने ओळखले जात असे.
१८८१ या वर्षी ते मैट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले.विधवा-पुनर्विवाह आणि महिलांचे शिक्षण व त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले. हिन्दू समाजात चालू असलेली अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या विरुद्ध ते लढले.
विधवा पुनर्विवाहसाठी त्यांनी 'विधवा विवाहोत्तेजक' मंडळाची स्थापना केली.त्यांनी महिला विद्यालय,निष्काम कर्म मठ,कन्या शाळा,समता संघ सुद्धा स्थापित केले.त्यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाची स्थापना केली.
त्यांनी मराठीत 'आत्मवृत्त' नावाचे पुस्तक आणि इंग्रजीत 'लुकिंग बैक' नावाचे पुस्तक लिहिले.त्यांच्या कामगिरिसाठी त्यांना पद्मविभूषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले. वयाच्या १०४ व्या वर्षी ९ नोव्हेंबर,१९६२ रोजी पुणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Explanation:
Answer:
आधी केले । मग सांगितले ।।' अशा वृत्तीची जी माणसे असतात त्यांचा उल्लेख आचार्य अत्रे ‘कर्ते सुधारक' म्हणून करतात. अशा या सुधारकांत ज्यांचे नाव अग्रभागी घेता येईल असे विचारवंत म्हणजे महर्षी अण्णासाहेब कर्वे, धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ मध्ये मुरुड येथे एका सामान्य कुटुंबात झाला होता. शिक्षणासाठी कर्वे पुण्यात आले आणि तत्कालीन परिस्थितीमुळे ते अस्वस्थ झाले. त्यावेळी उच्च वर्णीय समाजात स्त्रियांची परिस्थिती अतिशय दयनीय होती. विशेषतः विधवा स्त्रियांची स्थिती तर अतिशय कठीण होती. समाजाने त्यांच्यावर कर्मठ निर्बंध घातले होते. त्या काळात बालमृत्यूचे प्रमाण खूप होते. म्हणून बालविधवांची संख्या फार मोठी होती आणि शिक्षणासाठी त्यांना कुटुंबीयांचा व पर्यायाने समाजाचा छळ सहन करत उभे आयुष्य काढावे लागत होते..
अण्णासाहेब कर्वे विचारांत पडले. विधुर झालेला पुरुष पुन्हा विवाह करू शकतो, मग विधवा स्त्री का विवाह करू शकत नाही? या प्रश्नाने ते अस्वस्थ होत. दुर्दैवाने अण्णांच्या प्रथम पत्नीचा मृत्यू झाला आणि अण्णांना घरातून पुन्हा लग्नासाठी आग्रह होऊ लागला. तेव्हा अण्णांनी एक फार मोठे पाऊल टाकले. त्यांनी विवाह केला तो एका विधवेशीच - अगदी वपन केलेल्या स्त्रीशी. या धाडसाचे फळ म्हणून समाजाचा छळ, बहिष्कार त्यांनी सोसला. त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांनी अण्णांना समाजकार्यात जन्मभर साथ दिली.
विचारवंत अण्णा येथेच थांबले नाहीत. त्यांनी १८९३ मध्ये 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ' स्थापन केले. ज्या विधवांना कोणाचाही आधार नव्हता त्यांच्यासाठी अण्णांनी पुण्याजवळ हिंगणे येथे इ. स. १९०० मध्ये 'अनाथ बालिका आश्रम' स्थापन केला. त्या स्त्रियांसाठी तेथे शिक्षणसंस्था सुरू केली. समाजात पुनर्विवाहाची चळवळ सुरू व्हावी म्हणून अण्णांनी 'पुनर्विवाहितांचे मेळावे' भरवले या सर्व कार्याला समाजाकडून विरोध असतानाही अण्णा समाजाकडून पैसा उभा करत. त्यांचे ते निरपेक्ष, निरलस काम पाहून पुढे त्यांना काही अनुयायी मिळत गेले. स्त्रियांचे कार्यक्षेत्र काही अंशी वेगळे असल्यामुळे स्त्रियांना थोडे वेगळे शिक्षण दयावे,असे अण्णांना वाटे. त्याबद्दलचा विचार करत असताना अण्णांना जपानमधील स्त्रियांची विदयालये पाहून 'स्वतंत्र महिला विश्वविदयालयाची' कल्पना सुचली. मुंबईच्या ठाकरसी कुटुंबाने आर्थिक मदत केल्यावर १९१६ साली त्यांनी 'एस्. एन्. डी. टी. महिला विद्यापीठाची' स्थापना केली. अण्णांना दीर्घायुष्य लाभले. अखेरपर्यंत ते समाजकार्यात मग्न राहिले. अण्णांनी त्यासाठी विविध संस्था स्थापिल्या. आपल्यानंतरही हे स्त्री-उद्धाराचे कार्य अखंड चालावे त्यासाठी योग्य कार्यकर्ते मिळावे म्हणून १९१० साली अण्णांनी ‘निष्काम मठ' स्थापन केला. शहरात सुरू झालेले काम खेडोपाडीही पसरावे म्हणून १९३६ साली अण्णांनी 'महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' स्थापन केले. जातिभेद निर्मूलन आणि अस्पृश्यता निवारण या कार्यांसाठी त्यांनी १९४४ मध्ये 'समता संघ' उभारला. या साऱ्या संस्थांचा खर्च चालावा म्हणून आयुष्यभर अण्णा वणवण हिंडून पैसे गोळा करत असत. त्यांच्या या कार्याचे मोल लक्षात घेऊन आजही हिंगणे संस्थेकडून 'भाऊबीज निधी' उभा केला जातो.
एकविसाव्या शतकात सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेली आजची स्त्री अण्णांचे ऋण कधीच विसरणार नाही. ९ नोव्हेंबर १९६२ मध्ये अण्णांचे निधन झाले