Essay on मला परमेश्वर भेटला तर........
Answers
⠀⠀⠀⠀⠀मला परमेश्वर भेटला तर
अलीकडे काही वेळा दूरदर्शनवर बातम्या पाहिल्या किंवा त्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचल्या की अंगाचा तिळपापड होतो. काही लोकांनी आपल्या वैभवशाली देशाचा विध्वंस करण्याचा जणू विडाच उचलला आहे, असं वाटू लागतं. अशा वेळी वाटतं की, आपल्याला अलौकिक, दिव्य असं सामर्थ्य मिळालं पाहिजे, म्हणजे या देशद्रोह्यांना चांगला धडा शिकवता येईल. त्यासाठी एकदा परमेश्वरच भेटला पाहिजे...
होय, मला परमेश्वर भेटला ना, तर मी त्याच्याकडे दोन वर मागीन. एक, अदृश्य होण्याचा आणि दुसरा, काहीही विधायक करण्याची शक्ती देणारा ! हे वर मिळाले की, मी ताबडतोब अदृश्य होईन आणि अतिरेक्यांचा नायनाट करण्यासाठी सिद्ध होईन. मी अंतर्ज्ञानाने अतिरेक्यांना शोधून काढीन. ते दिसले की एकेकाकडे फक्त बोट दाखवायचं. बस्स! क्षणार्धात त्यांचं भस्म ! मी अदृश्य होऊ शकत असल्याने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात क्षणात पोहोचेन. जगातल्या एकूण एक अतिरेक्यांना शोधून काढून त्यांचा नाश करीन. या अतिरेक्यांना शस्त्र देणाऱ्या व त्यांना आश्रय देणाऱ्या एकाही व्यक्तीला माफ करणार नाही. मग ती कोणत्याही देशातील कितीही मोठी व्यक्ती असो !
अतिरेक्यांनंतर मी क्रमांक लावीन तो गुंडांचा, लुटारूंचा, दरोडेखोरांचा ! यांनी सध्या देशात धुमाकूळ मांडला आहे; लोकांना हैराण करून सोडलं आहे. पोलीस व सरकारसुद्धा हतबल झाल्यासारखे दिसत आहेत. अतिरेक्यांप्रमाणेच यांचाही मी नायनाट करीन! या सगळ्यांचा नायनाट झाल्यामुळे लोक निश्चितपणे सुखाने जगतील.
मात्र मी एवढ्यावरच थांबणार नाही. नंतर माझा मोर्चा वळणार आहे तो भ्रष्टाचार करणान्यांकडे. त्यांनी भ्रष्टाचार करून देशाचं अब्जावधी रुपयांचे नुकसान केलं आहे. त्यामुळे देशाची प्रगती खुंटली. यांना मात्र मो वेगळ्या पद्धतीने धडा शिकवीन. मी अदृश्य रूपात त्यांच्या घरी जाईन. प्रथम त्यांना त्यांच्या समोरच्या वस्तूच हवेत तरंगवून दाखवीन. हे पाहिल्यावर त्यांची बोबडीच वळेल. ते 'भूत, भूत' म्हणून सैरावैरा पळायचा प्रयत्न करतील. पण त्यांना दरडावून सांगीन को, भ्रष्टाचार करून मिळवलेला एकूण एक पैसा जाहीर करा आणि देशाच्या खजिन्यात जमा करा. आत्ताच्या आत्ता ! शिवाय त्यांना माहीत असलेल्या इतर भ्रष्टाचाऱ्यांची नावे जाहीर करायला लावीन. नाहीतर त्यांचं भस्म करण्याची धमकी देईन. त्यांना याची खात्री पटावी म्हणून त्यांच्या समोरच एखादया वस्तूचं भस्म करून दाखवीन. त्यामुळे देशभर खळबळ माजेल. भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती हे सारे भ्रष्टाचारी देशाच्या खजिन्यात भरतील! एका दिवसात देशाचे कोषागार समृद्ध होईल.
याच पद्धतीने कार्यालये, कंपन्या, कारखाने येथे काम करणाऱ्या भ्रष्ट कर्मचा-यांना, अधिकाऱ्यांना जरब बसवीन. त्यांना प्रामाणिकपणे काम करायला लावीन. पर्यावरणाचा नाश करणाऱ्यांना देखील धडा शिकवीन. आणखी एक काम मी नक्की करीन. मी देशभरातील सर्व शेतांत नियमितपणे समाधानकारक पाऊस पडेल असे पाहीन. मग माझा देश समृद्ध होईल. तो साऱ्या जगाला धान्य पुरवील. माझा देश जगातील सर्व श्रेष्ठ देश बनेल. पण त्यासाठी मला परमेश्वर फक्त एकदा भेटायला हवा...! बस्स!