ग्रामीण जीवनातील समस्या – मराठी निबंध, भाषण, लेख, माहिती
Answers
Answer: आजच्या शतकातील सर्व समस्यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे वाढते शहरीकरण आणि ओस पडत चाललेली खेडी. या समस्येचे मूळ शोधले असता लक्षात येते की ग्रामीण भागात असलेल्या समस्या हे वाढत्या शहरीकरणाचे खरे कारण आहे.
ग्रामीण भागात लोकांचे पोट हे शेतीवर अवलंबून असते. पाऊस व्यवस्थित पडला तरच शेतीतून पीक चांगले येते. त्यामुळे हा व्यवसाय फार जिकीरीचा आहे. अजूनही शेतकऱ्यांसाठी असलेल्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचत नाहीत. नवीन तंत्रज्ञान महागडे असल्याने गरीब शेतकऱ्यांना ते परवडत नाही. काही ठिकाणी प्यायला पाणी नाही. गावात उच्च शिक्षणाची सोय नाही. तर काही ठिकाणी सुसज्ज दवाखाने नाहीत. अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ग्रामीण भागातील जनतेला शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे ते स्थलांतराचा पर्याय स्विकारतात. परंतु यामुळे मूळ समस्या मागेच राहते आणि शहरीकरणासारखी नवीन समस्या उद्भवते.
त्यामुळे इतर समस्या टाळायच्या असतील तर आधी ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक आहे.
Explanation:
Answer:
महात्मा गांधीजींनी 'खेड्यांकडे चला' असा संदेश दिला होता. त्यावेळी काही ध्येयनिष्ठ तरुण खेड्यांकडे वळलेही; पण स्वातंत्र्यानंतरची पन्नास वर्षे उलटून गेल्यावर भारतीय खेड्यांचे रूप कसे आहे? दिवसेंदिवस खेड्यांकडून शहरांकडे माणसांचा ओघ वाढत चालला आहे. शहरे लोकसंख्येने अवास्तव विस्तारत आहेत आणि खेडी ओस पडत आहेत. ती अधिकाधिक दरिद्री बनत चालली आहेत. असे का? अशा कोणत्या समस्या आहेत ग्रामीण जीवनाच्या?
आज शहरांत भयंकर गर्दी, जागेचा-पाण्याचा तुटवडा, प्रदूषणाची भेसूर समस्या, अपघात, हिंसा यांची सततची टांगती तलवार... असे असतानाही लोकांचे लोंढे खेड्यांकडून हा शहरांकडे का वळतात? चटकन उत्तर मिळते – 'पोटासाठी.' ज्याचे गावात शेत नाही वा मळा नाही त्याला गावात रोजगार नाही, ही ग्रामीण भागातील सर्वांत मोठी समस्या आहे. पूर्वीची हत बलुतेदारी नष्ट झाली, पण त्याला पर्यायी उदयोग उभे राहिले नाहीत. एखादया छोट्याशा शेतकऱ्याने कष्टाने एखादे पीक काढले, तर त्याला गावात योग्य भाव मिळत नाही. मग त्याला पडेल भावाने तो माल विकावा लागतो किंवा एखादया दलालामार्फत माल शहरात पाठवावा लागतो. शेतकऱ्याचा सगळा फायदा दलालच खातो.
ग्रामीण भागात आवश्यक सुधारणा पोहोचू शकल्या नाहीत. कित्येक गावांत पाण्याची कायम टंचाई असते. वाहतूक व्यवस्था, दळणवळणाची साधने यांचा पूर्ण अभाव असतो. शाळा, महाविदयालय या शैक्षणिक सुविधा नसतात. कित्येक खेडेगावांत रुग्णालये सोडाच, पण वेळप्रसंगी डॉक्टरही उपलब्ध नसतो. शहरात आज मनोरंजनाची साधने विपुल आहेत. स्वाभाविकच तरुण पिढीला याचेच आकर्षण असते. मग ते खेड्यांतून शहरांकडे पळतात. गावे माणसांशिवाय ओस पडतात.
ग्रामीण जीवनातील काही समस्या या तेथील लोकांच्या अज्ञानातून, अंधश्रद्धेतून निर्माण होतात. गावातील एखादया धनिकावर, सावकारावर वा त्याच्या मर्जीवर गावातील गरिबांचे जीवन अवलंबून असते. ग्रामीण जीवनात अजून जातपात, स्पृश्यास्पृश्यता यांचे प्रस्थ आहे. शहरात येऊन शहरी वातावरणाचा लाभ घेऊनही आपापल्या गावी गेल्यावर हेच लोक पुन्हा आपली जात, धर्म, पारंपरिक चालीरीती सांभाळत राहतात. या साऱ्या दुष्टचक्रातून ग्रामीण समाजाला मुक्त करायचे असेल तर समाजसेवी संस्थांनी आणि सेवाभावी युवकांनी ग्रामीण जीवनाच्या ज्वलंत समस्या सोडवण्यात पुढाकार घेतला पाहिजे.