katha lekhan :-. naavetun pravaas -ek pandit dusri naavadi
Answers
आमची कोकणातली बोटीची फेरी माझ्यासाठी भीतीदायक, तर नवरा आणि मुलासाठी थ्रिलिंग होती. तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही.
प्रत्येकाच्या ट्रिपमध्ये अविस्मरणीय प्रसंग असतातच. माझ्या कोकणातल्या ट्रिपचा एक असाच प्रसंग, जो आजही मला आठवतो. आम्ही तिघं, मी माझा नवरा आणि मुलगा चिपळूणला आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेलो होतो. कोकणात प्रथमच पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायचा बेत आम्ही केला होता. हॉटेल अगदी प्रशस्त होतं. स्वागत कक्षात गोड हासणाऱ्या एका रिसेप्शनिस्टनं आमचं स्वागत केलं. अर्थातच, कोकण स्पेशल असं कोकम सरबत आमच्यासाठी वेलकम ड्रिंक म्हणून समोर आलं. सरबताचा आस्वाद घेता घेता, सभोवतालचा परिसर आम्ही न्याहाळत होतो. हॉटेलच्या मागच्या बाजूला हिरवागार लॉन आणि स्विमिंग पूल होता. दोन दिवसांच्या पॅकेजमध्ये आमच्यासाठी वासिष्ठी नदीत बोट फेरी आयोजित केली होती.
संध्याकाळी आम्ही हॉटेलनं दिलेली कुपन्स दाखवून बोटीत स्थानापन्न झालो. खरंच संध्याकाळच्या वेळेला दिसणारं नदीचं सौंदर्य काहीसं गूढ भासत होतं. मी घाबरल्यामुळे नावाड्याला विचारलं, किती वेळाची आहे ही फेरी, त्यानं यावर काहीच उत्तर दिलं नाही. तो हिंदी भाषिक आहे की काय, म्हणून मी हिंदीतही विचारून पाहिलं, तरीही त्याचं काही उत्तर आलं नाही. नवरा आणि मुलगा, सूर्य मावळतानाचे फोटो काढण्यात दंग असतानाच, समोरच्या खडकावर दोन मगरी दिसल्या. आता मात्र माझी बोलतीच बंद झाली. या दोघांच्या फोटोग्राफीला उधाण आलं होतं.
तेवढ्यात एका खडकाजवळ आमची बोट थांबली. मी नावाड्याकडं पाहिलं, त्याचा चेहेरा घामानं डबडबला होता. तो खुणेनं काहीतरी सांगत होता. तो मुका आहे, हेही तेव्हाच लक्षात आलं. बोट थांबवली नसून रुतली आहे, हे सांगायचा तो प्रयत्न करत होता हे एव्हाना माझ्या लक्षात आलं. आता माझी दातखीळ बसणंच बाकी होतं. समोरच्या खडकावर मगरी आ वासून पहुडल्या होत्या. मी हिंदी सिनेमातल्या नायिका कशा ‘बचाओ...बचाओ’ म्हणून ओरडतात, तशी जोरानं ओरडू लागले. मी ओरडण्याचं काम केलं आणि बाकी तिघंही बोट काढण्यासाठी प्रयत्न करत होते. पाच मिनिटांच्या प्रयत्नांनंतर बोट निघाली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आला आणि बोट सुरू झाली.
आत्तापर्यंत नदीपात्राला काळोखानं वेढलं होतं. बोटफेरीची शेवटची दहा मिनिटं माझ्यासाठी दहा तासांसारखी होती. रामरक्षेची तर पारायणं चालली होती. तेवढ्यात नदीकाठ दिसला. मी सर्वांत प्रथम नावेतून खाली उतरले आणि सुटकेचा श्वास सोडला. माझ्यासाठी भीतीदायक, तर नवरा आणि मुलासाठी थ्रिलिंग अनुभव देणारी ती कोकणातल्या ट्रीपची ‘बोटफेरी’ सुफळ संपूर्ण झाली होती.