माझा आवडता छंद निबंध इन मराठी
Answers
Answer:
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता छंद मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्येक जण आपल्या आवडत्या छंदातुन आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो.कुणाला छंद असतो शिकारीचा, तर कुणाला छंद असतो गडकिल्ले हिंडण्याचा. कुणाला छंद असतो पोस्टाची तिकिटे, नाणी किंवा विविध जुन्या वस्तू गोळा करण्याचा. कुणी मित्र गोळा करून पत्ते कुटत बसतात.
तर कुणी एकटेच सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र करतात; तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्रे खेचतात. माझा छंद तसा जगावेगळा आहे. मला लहानपणापासून आवड आहे ती माणसे जोडण्याची आणि जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी माझी ही आवडही वाढत गेली.
तसे पाहता आमचे कुटुंब फार छोटे आहे. आई, बाबा आणि मी. पण अगदी लहानपणापासून मला आपल्या घरी खूप माणसे यावीत, गर्दी व्हावी, गडबड उडावी असे वाटे. आई सांगते की, मी लहानपणी आपल्याकडे 'हळदीकुंकू' कर, 'सत्यनारायणाची पूजा' कर असा नेहमी हट्ट करीत असे. कारण त्यामुळे घरात खूप माणसे येत. सुट्टीचा वार रविवार वा सुट्टीचा 'मे' महिना मला फार प्रिय आहे. कारण सुट्टीमुळे खूप पाहणे घरी येतात. सुट्टी येण्यापूर्वीच मी माझ्या आप्तांना, मित्रांना आमंत्रणे पाठवितो. त्यांना वाटते की किती विनम्र, लाघवी मुलगा आहे. पण माझे माणसवेड त्यांना 'अनभिज्ञ' असते.
मला आवडतात ती माणसे फक्त नात्यागोत्याचीच अथवा आपल्या योग्यतेची असतात असे नाही हं! मला कोणतीही माणसे आवडतात. आम्ही राहतो त्या कॉलनीत आमचा बंगला पहिला बांधला गेला. इतर सतरा बंगले नंतर आमच्या देखत बांधले गेले. तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो; भरपूर मोकळा वेळ असे. त्यावेळी बांधकाम करणाऱ्या माणसांशीही मी दोस्ती करीत असे. बांधकामावर खूप स्त्रिया असत. त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुले असत.
या मुलांबरोबर मी खूप खेळत असे. त्यांच्याकडूनच मी विटीदांडूचा खेळ शिकलो. ही मुले लहान वयातही आपल्या आईवडिलांना केवढी मदत करीत. आज ती मुले वयाने मोठी होऊन पुरुष झाले आहेत, त्यांच्यातील कित्येकजण स्वतंत्र कामे करू लागले आहेत.
मी मोठ्या शाळेत जाऊ लागलो, तसा माझा हा छंद वाढतच गेला. वर्गातील दोस्तच काय, पण शाळेतील सगळी मुले माझे मित्र बनले. तसा माझा स्वभाव बडबड्या आहे. मला बोलायला खूप आवडते, पण तितकेच मला इतरांचे विचारही ऐकायला आवडतात. त्यामुळे दूरचा प्रवासही मला कधी कंटाळवाणा होत नाही. प्रवासात अनेक ओळखी होतात, अनेक अनुभव ऐकावयास मिळतात, अनेक दोस्त मिळतात,
गाडीत माल विकणाऱ्या फेरीवाल्यांबरोबरही मला गप्पा मारायला आवडतात. माझे वडील म्हणतात, "अरे, यांच्याशी तू कसल्या गप्पा मारतोस?" मी फक्त हसतो. पण मला आठवते ते काणेकरांनी सांगितलेले, 'सामान्याचे असामान्यत्व.' काणेकर त्यांचा अनुभव सांगतात की, ज्या माणसाजवळ डोके कमी त्याच्याजवळ माणुसकी मोठी असते. मलाही हा अनुभव आलेला आहे. 'बोलघेवड्या मित्रांपेक्षा साधेभोळे, कष्टकरी मित्रच आपल्या जास्त उपयोगी पडतात.'
माझा हा माणसे जोडण्याचा छंद आहे ना, त्याचेही मी एक शास्त्र तयार केले आहे. मला जेव्हा नवीन मित्र भेटतात तेव्हा मी त्या मैत्रीची नोंद ठेवतो. त्या मित्रांचे पत्ते लिहून ठेवतो. वेळोवेळी त्यांना पत्रे लिहितो. त्यांची पत्रे मला येत असतात. त्यामुळे जीवघेणा कंटाळा मला कधीही ग्रासू शकत नाही. मी कधीही एकटा नसतो. मी जोडलेली असंख्य माणसे, मित्र सदैव माझ्याभोवती असतात-कधी प्रत्यक्ष, तर कधी पत्ररूपाने किंवा फोटोरूपाने.