Maje Aaji aani aabavar essay in Marathi
Answers
आजी म्हटलं कि आठवते ती उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा, आजीच्या गमतीदार गोष्टी, आजीचे लाड, प्रेम आणि बरंच काही. आपली आजी म्हणजे अखंड प्रेमाचा झराच जणू. मुलांना शाळेमध्ये बरयाचदा माझी आजी या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. ह्या लेखामध्ये आम्ही माझी आजी या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला माझी आजी ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.
माझी आजी – मराठी निबंध, भाषण, लेख
मला आई बाबा रागावले की, मी आजीकडे धाव घेते. मग आजी मला प्रेमाने जवळ घेते. आई-बाबांचे आजीपुढे काहीच चालत नाही. उलट त्यांनाच म्हणते, लेकरू लहान आहे रे, रागावू नका रे. त्यामुळे मी पदराआड लपते. ती मला प्रेमाने जवळ घेऊन ‘ अगं राणी, असे वागू नये. चांगले वागावे, मोठ्यांचे ऐकावे, असा उपदेश करते. तिचा प्रेमळ स्वभाव मला फार आवडतो.
माझ्या आजीचा वेश म्हणजे साधी सुती साडी व तसलेच पोलके. आणि कपाळावर भले मोठे कुंकू. हे माझ्या आजीचे दृश्यरूप आहे. तिचे राहणीमान अत्यंत साधे आहे. आजीला दागिन्यांचा सोस नाही. वयाची साठी उलटली असली तरी आजीच्या चेहऱ्यावर तेज आहे. दिवसभर काम करूनही ती हसतमुख असते. ‘कंटाळा’ हा शब्द तिच्या जीवनात नाही.
आजीचा स्वभाव धाडसी आहे. कोणतेही संकट आले तरी ती त्यास हसतमुखाने तोंड देते. माझ्या आजोबांना खूप बरे वाटत नव्हते. पण एवढ्या मोठ्या संकटात पण आजीने त्यांची रात्रंदिवस सेवा करून त्यांच्यावरचे संकट दूर केले. आता आजोबा छान हिंडतात-फिरतात. त्यांचे खाणे, पिणे, फिरणे, जागरण याकडे आजोबा आजारी असल्यापासून अगदी आजी काटेकाळजीने लक्ष देते. त्यामुळेच आजोबा पूर्णपणे बरे होऊन फिरत आहेत. आजी जुन्या साड्यांच्या उबदार व मजबूत अशा सुंदर चौघड्या शिवते. स्वयंपाक तर आजी इतका सुंदर करते की तिच्या हाताची सर दुसऱ्या कुणालाच येणार नाही. ‘स्वच्छता’ हा तर आजीचा स्थायीभाव आहे. शिक्षणाविषयी तिला फार गोडी वाटते. हा तिच्या स्वभावातला एक विशेष भाग आहे.