मराठी निबंध गांव ची जत्रा
Answers
एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात.
लोक संपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. बऱ्याच ठिकाणी जत्रेमध्ये अन्नदान केले जाते. एखाद्या देवाच्या नावाने लोकांना आमंत्रित करून त्यांना देवाचा प्रसाद म्हणून अन्न वाटले जाते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशी प्रथा आढळते. एका ठरविलेल्या दिवशी गावातील प्रत्येक कुटुंब आपापल्या पाहुण्यांना, मित्र मंडळींना आमंत्रित करून जेवू घालतात. त्या दिवशी गावामध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तमाशा हा त्यापैकीच एक असा मनोरंजनाचा प्रकार ग्रामीण भागामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये लोकसंपर्काच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी जत्रा ही एक अतिशय महत्त्वाची पद्धती आहे. अशा या जत्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील समुदाय या जत्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होताना दिसतात. या अशा जत्रेतून सामाजिक एकोपा जपला जातो. ह्या धार्मिक कारणां बरोबरच आर्थिक व व्यावहारीक उलाढालींसाठी सोयीचे केंद्र असते. (उदा. शहाद्या जवळील सारंगखेड च्या जत्रेतला घोडे बाजार कोट्यवधींच्या उलाढाली साठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
Answer:
पुण्यापासून जवळच मुळशी तालुक्यातील मुठा हे माझे गाव. गावची जत्रा म्हटलं कि जसा एक वेगळाच उत्साह सर्वांच्या मनात असतो तसाच उत्साह आणि एक आनंद माझ्या मनात असतो. कधी एकदा गावच्या जत्रेचा दिवस उजाडतो आणि कधी मी गावाला सर्व भावंडांसोबत जातेय असे मला वाटते. गावच्या जत्रेला जाताना आम्ही सर्व भावंडे आणि मावशी-काका, मामा-मामी, आजी-आजोबा असे सगळे एकत्र गावाला जातो. गावी जाण्याआधी आम्ही सर्व भावंडे आनंदात असल्यामुळे सर्व तयारी करण्यास घरातील मोठया माणसांना मदत करतो. आमचीसुद्धा तयारी आम्ही जाण्याआधी दोन दिवस आधीच करण्यास सुरुवात करतो.
आम्ही भावंडे पिण्याचे पाणीसुद्धा गावाला नेतो कारण आम्हाला गावाकडचे विहिरीचे पाणी आवडत नाही. आम्ही एसटी किंवा चारचाकी गाडीने गावाला जातो. फार फार वर्षांपूर्वी आमच्या गावी बैलगाडीने जावे लागायचे कारण त्यावेळी जाण्यासाठी काही साधन नव्हते आणि रस्तासुद्धा खूप लहान,खराब होता, असे आमचे आजी-आजोबा सांगतात. पण आता आमच्या गावाला जायला इतरही छोट्या मोठ्या वाहनांची सोया झाली आहे. तसेच आमच्या गावापासून थोड्याच अंतरावर लवासा सिटी झाली आहे. त्यामुळे रस्तेसुद्धा खूप सुधारले आहेत आणि गावातसुद्धा खूप प्रगती झाली आहे. पूर्वी आमच्या गावामध्ये दोन-तीनच दुकाने होती पण आता गावात भरपूर दुकाने आणि बँकसुद्धा झाली आहे. गावामध्ये पोहोचल्यानंतर सर्व नातेवाईक खूप दिवसांनी भेटतात आणि कसे आहात याची चौकशी करतात. गावात सर्वांच्याच घरी जत्रेसाठी भरपूर पाहुणे पुण्यातून तसेच इतर शहरातून आलेले असतात.जत्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांना भेटतात त्यामुळे एक आपुलकीची भावना सर्वांच्याच मनात निर्माण होते आणि विचारांची देवाण-घेवाण सुद्धा होते.गावाची जत्रा ही विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरामध्ये भरते. त्यामुळे सर्व गावकरी मिळून जत्रेच्या आधी मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करतात. तसेच मंदिरसुद्धा खूप स्वच्छ करतात. त्याचबरोबर गावातील सर्वच मंदिरांमध्ये त्यादिवशी साफसफाई केली जाते. विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर जत्रेच्या दिवशी रंगबेरंगी फुलांनी सजवतात. त्यानंतर गावातील सर्व मंदिरांमध्ये मनोभावे पूजा,आरती करतात आणि नैवेद्य दाखवतात. सर्वांच्याच घरी त्यादिवशी पुरणपोळीचा बेत असतो.गावच्या जत्रेच्या पहिल्या दिवशी देवाची पालखी संपूर्ण गावात फिरते. सर्वजण मनोभावे नमस्कार करतात हार-फूले वाहतात आणि देवाचा भंडारा उधळतात. देवाची ही पालखी ढोल,लेझीम,ताशा अशा वाद्यांच्या गजरात संपूर्ण गावात फिरते. त्यावेळी लहान मुलांची खूप मजा असते तेव्हा आम्ही सर्व भावंडे खेळतो आणि भंडाऱ्यामध्ये नाचतो. तसेच पालखीसोबत संपूर्ण गावात फिरतो. तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर पालखी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवली जाते. जत्रेच्यादिवशी मंदिराच्या परिसरामध्ये खूप गर्दी असते. खेळण्यांची दुकाने,मिठाईची दुकाने आणि इतर गृहपयोगी वस्तू असे सर्व काही जत्रेत विकायला असते. सर्व घरातील मोठी माणसे आम्हाला सगळ्या भावंडांना खरेदी करण्यासाठी पैसे देतात. मग आम्ही सर्व भावंडे आणि मामा-मामी,मावशी-काका या मोठ्या माणसांसोबत जत्रेमध्ये जातो.
पहिल्यांदा आम्ही सर्व मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो त्यानंतर आम्ही जत्रेत खरेदीसाठी जातो. आम्ही जत्रेत खेळणी,दागिने, लहान भावंडांसाठी फुगे आणि मिठाई खरेदी करतो. त्यानंतर आम्ही आकाश पाळण्यामध्ये खेळतो. आमच्या गावामध्ये जत्रेच्यावेळी कुस्ती स्पर्धासुद्धा असतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराजवळच कुस्ती आखाडा आहे तिथे या कुस्ती स्पर्धा असतात. आमचे गाव संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये कुस्तीगीरांसाठी प्रसिद्ध आहे.