नाटक हा साहित्य प्रकार प्रेकशकाना आपलासा वाटतो कारण?
Answers
Answer:
एकतर त्याने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते, किंवा कोणीतरी त्याला नाटकाविषयी सांगितलेले असते. मग तो नाटक पाहायला जायचे ठरवतो, कोणासोबत किंवा एकटेच. कदाचित त्या नाटकाचा भाग असलेल्या कोणीतरी त्याला नाटक पाहायचे आमंत्रण दिलेले असते, नाहीतर मग तो तिकिट काढतो.
प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला माणूस नाटकघरात पोचतो. त्याच्याप्रमाणेच इतरही लोक नाटक पाहायला आलेले असतात. नाटकघराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या तसेच काही आगामी नाटकांची माहिती लावलेली असते. या माहितीमध्ये प्रामुख्याने नाटक कधी, किती वाजता आणि कुठे सादर होणार आहे, नाटकाचे नाव काय आहे, नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार कोण आहेत हे लिहिलेले असते. क्वचित प्रसंगी नाटकाचा प्रकार (संगीत, कौटुंबिक, सामाजिक, वगनाट्य, विनोदी, फार्स, इत्यादी) किंवा नाटकाचा विषय (महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे, भ्रष्टाचारावर भाष्य करणारे, इत्यादी) देखील नोंदविलेले असते. कधीकधी नाटकातील कलावंतांची किंवा नाट्यप्रसंगांची छायाचित्रे असतात. ते वाचत, बघत असतानाच माणसाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झालेली असते.
त्यानंतर माणूस तिकिट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर अनेक खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात. तो त्याच्या आसनावर जाऊन बसतो. त्याच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतात. मग तो पण ह्या प्रेक्षकसमूहाचा एक भाग होतो. थोड्या थोड्या कालावधीने तीन घंटा होतात, प्रेक्षागृहातील दिवे मंद होऊ लागतात. आता, सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितले जाऊ लागते. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो. नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.
रंगमंचावर हळूहळू प्रकाश येऊ लागतो आणि प्रेक्षक नाटकाच्या विश्वात प्रवेश करतो. कधी कधी मंचावर काही वस्तू मांडलेल्या असतात, त्यावरून त्याला हे नाटक कुठे घडते आहे याची कल्पना येऊ शकते. एखादे घर किंवा कार्यालय, महाल, रस्ता किंवा जंगल असे काहीही. मंचावर असलेले किंवा प्रवेश केलेले नट-नट्या त्याला व्यक्तिरेखांची प्रचिती देतात. या व्यक्तिरेखा त्याच्याच समाजातील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांसारख्या असू शकतात किंवा परक्या देशातल्या, इतिहासातल्या किंवा काल्पनिकदेखील असू शकतात. त्यांनी घातलेले कपडे, त्यांचे चालणे बोलणे असे काही असते की, ते ज्या जगात राहतात त्याची प्रेक्षकाला कल्पना येऊ शकते.
हळूहळू नाटक पुढे सरकते. प्रेक्षकाला नाटकातील व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध लक्षात यायला लागतात. कोणकोणत्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या जवळ येता आहेत, कोणकोणत्या एकमेकांशी फटकून वागताहेत. हळूहळू आपल्याला त्यांचा परिचय होऊ लागतो. काही व्यक्तिरेखा त्याला आपल्या अगदी जवळच्या वाटतात, तर काहींचा त्याला राग येतो. मंचावर जे काही घडते आहे त्यामुळे कधी त्याला गंमत वाटते तर कधी तो गंभीर होतो. व्यक्तिरेखा जेव्हा स्वतःचीच चेष्टा करतात, तेव्हा तो पण त्यांच्यावर हसतो. जेव्हा त्यांच्यावर संकटे कोसळतात, तेव्हा त्याला त्यांची काळजी वाटायला लागते. त्यांच्या वेदनेने तो ही दुःखी होतो. कधी नाटकातील थरार आणि रहस्य वाढत जाते, प्रेक्षक श्वास रोखून पहात राहतो. नाटक त्याच्या अत्युच्च बिंदुपाशी पोचते. हळूहळू प्रसंगांची उकल होते, आणि शेवटी त्याला हायसे वाटते.
पडदा पडतो. नाटक संपते. प्रेक्षाघरातील दिवे उजळतात.नाटक बघायला आलेली माणस टाळ्या वाजवतात. लोक हळूहळू प्रेक्षाघराबाहेर पडून काल्पनिका विश्वातून वस्तुनिष्ठ विश्वात प्रवेश करतात. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र त्या प्रेक्षाकाच्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात. हा अनुभव केवळ एखाद्यालाच नाही तर अनेकांना येतो. शेकडो वर्षांपासून लक्षावधी-कोट्यवधी प्रेक्षक हा अनुभव घेत आलेत. अर्थात प्रत्येक वेळी हा अनुभव असाच असेल असे मात्र नाही; कधी ते जास्त हसले असतील तर कधी जास्त दुःखी झाले असतील. नाटकाचा हाच अनुभव अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी अनुभवता येऊ शकतो. कधी एका मोठ्या प्रेक्षाघरात हजारो लोकांसोबत हा अनुभव घेता येतो, तर कधी समीपमंच घरात अगदी साठ-सत्तर प्रेक्षकांसोबत हा अनुभव घेता येतो. कधी नाटकातल्या गोष्टीत प्रेक्षक गुंगून जातो, तर कधी नाटकातील गोष्टीमुळे त्याला सभोवतालची जाणीव होते. कधी त्याला स्वतःसारख्याच व्यक्तिरेखा दिसतात, तर कधी आदर्श व्यक्तिरेखा दिसतात. काही नाटकांमधून त्याच्या भोतालच्या समाजातील समस्या मांडल्या जातात, तर काही नाटके त्याला त्रिकालबाधित सत्याची जाणीव करून देतात; काही विचार करायला लावतात, तर काही केवळ केवळ अनुभव देतात. असे जरी असले, तरी एखाद्या नाट्यप्रयोगाचा एकदा जो अनुभव येतो, तो एकदाच येतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणिक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे.