सिनेमाचा इतिहास सागून सत्यजीत रे यांचे सिनेमातले
योगदान सांगा?
Answers
Answer:
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ भारतीय चित्रपट-दिग्दर्शक. कलकत्ता येथे एका कलावंत बंगाली कुटुंबात जन्म. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, कलेच्या ओढीमुळे १९४० साली ते रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेने शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले. नंदलाल बोस यांच्यासारख्या चित्रकार-कलातज्ञाचे तेथे मार्गदर्शन लाभल्यामुळे रे यांची अंगभूत कलासक्ती आणि सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होत गेली. तेथून बाहेर पडल्यावर १९४३च्या सुरुवातीला‘डी. जे. केमर अँड कंपनी’ या ब्रिटिश जाहिरातसंस्थेत त्यांची वाणिज्य कलाकार म्हणून नेमणूक झाली. पुस्तकांची मुखपृष्ठे अत्यंत कलात्मक रीतीने सजविण्यात त्यांचा हातखंडा होता. नोकरीत असतानाच त्यांची चित्रपटाची रुची आणि व्यासंग वाढत गेला. रे त्यावेळी अनेक नियतकालिकांतून चित्रपटविषयक लेख लिहीत असत. १९४७ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ सुरू केली. १९५० मध्ये त्यांना कंपनीतर्फे उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठविण्यात आले. तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी शेकडो उत्तमोत्तम चित्रपट पाहिले. मात्र त्यांना स्वतःचा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली, ती मुख्यत्वे डी सिका या दिग्दर्शकाच्या द बाय्सिकल थीफ या चित्रपटामुळे.
भारतात परतल्यावर त्यावेळी येथे वास्तव्य असलेल्या फ्रेंच दिग्दर्शक झां रन्वार यांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. तत्पूर्वी बिभूतिभूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या पथेर पांचाली या कथेने त्यांच्या मनात घर केले होतेच. त्याच कथेवर चित्रपट काढावा असे त्यांना इतक्या तीव्रतेने वाटू लागले, की बोटीतून हिंदुस्थानात परत येत असतानाच त्यांनी त्यावर चित्रपटकथा लिहायला सुरुवात केली होती. नोकरी सांभाळून फावल्या वेळात चित्रपट तयार करायचा असल्याने चित्रणकाळ अगोदरच लांबत गेला होता आणि पैशाचे सर्व प्रवाह आटले होते. योगायोगाने पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी पाहून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकार आपल्या अंगावर घेईल, असे घोषित केले. त्यामुळेच ३-४ वर्षे रखडलेला चित्रपट १९५५ साली एकदाचा पुरा झाला. त्याच वर्षी न्यूयॉर्कची ‘म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट’ ही प्रसिद्ध संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरविणार होती. संस्थेच्या रे यांना परिचित असलेल्या एका प्रतिनिधीने चित्रपटाचा काही भाग तत्पूर्वी पहिलाही होता. अचानक न्यूयॉर्कहून चित्रपट दाखविण्याबद्दल मागणी आली. अशी अमोल संधी दवडू नये म्हणून रांत्रदिवस मेहनत करून चित्रपटाचे सर्व संस्कार पुरे करण्यात आले आणि पथेर पांचालीचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले. त्यानंतर सु. दोन महिन्यांनी चित्रपट भारतात, म्हणजे कलकत्त्यात दाखविण्यात आला.