सर्वात प्राचीन वाड्मयीन ग्रंथ कोनता
Answers
Answer:
वेदकालीन इतिहासाचे मुख्य साधन वेदवाङ्मय हेच होय. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद, त्यांचे ब्राह्मणग्रंथ, त्यांच्या शेवटी घातलेली किंवा क्वचित् स्वतंत्र अशी आरण्यके व उपनिषदे यांचा अंतर्भाव होतो. प्राचीन काळी या चारही वेदांच्या अनेक शाखा प्रचलित होत्या व त्यांचे ग्रंथही थोडयाफार फरकाने भिन्न होते. ⇨पतंजलीने आपल्या ⇨महाभाष्यात म्हटले आहे, की ऋग्वेदाच्या एकवीस शाखा, यजुर्वेदाच्या एकशे-एक शाखा, सामवेदाच्या सहस्र शाखा व अथर्ववेदाच्या नऊ शाखा प्रचलित आहेत. मात्र सामवेदाच्या सहस्र शाखा यांचा अर्थ सहस्र संहिता व ब्राह्मणे असा न करता सहस्रप्रकारची सामगायने असा केला तर सुसंगत ठरतो. यातील फारच थोडे वाङ्मय सध्या उपलब्ध आहे. ऋग्वेदाच्या संहितांपैकी शाकल संहिता ही सध्या मुख्यतः प्रचलित आहे. यजुर्वेदाचे कृष्ण व शुक्ल असे दोन मुख्य भेद आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या काठक, कपिष्ठल, मैत्रायणी आणि तैत्तिरीय अशा चार शाखा प्रसिध्द असून शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व आणि माध्यंदिन अशा दोन शाखा प्रचलित आहेत. सामवेदाच्या संहितांपैकी कौथुम, जैमिनीय व राणायनीय या तीन संहिता प्रसिध्द आहेत. अथर्ववेदाची शौनक व पैप्पलाद संहिता प्रसिध्द झाल्या असून दुसऱ्या पैप्पलाद संहितेची नवीन हस्तलिखिते अलीकडे सापडली आहेत. या सर्व वाड्मयाला श्रुती अशी संज्ञा आहे. कारण ते कोणी रचलेले नसून त्याचा साक्षात्कार ऋषींना झाला होता, अशी धार्मिक श्रध्दा आहे. याशिवाय वैदिक वाङ्मयात अंतर्भूत नसलेली पण त्या वाड्मयाच्या ज्ञानाकरिता उपयुक्त शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदःशास्त्र व ज्योतिषशास्त्र अशी सहा वेदांगे आहेत. हे सर्व वाङ्मय वेदकालीन इतिहास व संस्कृती यांच्या ज्ञानाकरिता अत्यंत उपयोगी आहे. [→ वेद व वेदांगे].
वैदिक वाङ्मयात कोणत्याही कालनिर्देशपद्धतीचा उल्लेख नसल्यामुळे त्याचा काल काही विद्वानांनी अनुमानाने, तर इतर काहींनी त्या वाङ्मयातील ज्योतिषविषयक उल्लेखांवरुन ठरविण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचे निर्यण निश्चित रुपाचे मानले गेले नाहीत. अशा अनुमानांना निश्चित रुप प्राप्त होण्याकरिता उत्खननासारख्या उपोद्बलक प्रमाणांची जरुरी असते. सुदैवाने तसा पुरावा हूगो विंक्लर यांना ⇨आशिया मायनरमध्ये ⇨बोगाझकई येथे १९०६-१९०७ मध्ये केलेल्या उत्खननात सापडला आहे. तेथे सापडलेल्या विटेवरील कोरीव लेखात इंद्र, मित्र, वरुण आणि नासत्य (अश्विनौ) या वैदिक देवतांचा उल्लेख आहे. या लेखाचा काल ख्रिस्तपूर्व चौदावे शतक हा आहे. या लेखाने वैदिक कालावर कसा प्रकाश पडतो, याची चर्चा पुढे केलेली आहे.