सत नसेत तर eassy in marathi
Answers
Explanation:
साधुसंत येती घरा! तोचि दिवाळी दसरा' या शब्दांत संतांचे माहात्म्य आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. पण आज मात्र अनेकदा ‘साधू' या शब्दाचा संबंध भोंदू शब्दाशी लावला जातो. असे का? कारण आज साधूचा वेष धारण करून अनेक समाजद्रोही वावरत असतात. त 'साधू' या शब्दाबद्दलच समाजात चीड, तिरस्कार निर्माण झाला आहे. संत कसा असावा हे सांगताना तुकाराममहाराज म्हणतात
"भूतांची दया हेच भांडवल संता" खरा संत हा स्वतःचा विचार करीत नाही, तो सदैव दुसऱ्याचा विचार आधी करतो; कारण त्याचे सुख साठलेले असते ते दुसऱ्यांच्या सुखात. तसेच स्वतःसाठी जगणे हे खरे जगणे नव्हे असे तो मानतो, आर्तपीडितांसाठी तो धावून जातो. 'दुसऱ्यासाठी जगलास तरच खरे जगलास' असे तो मानतो.
"जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले" हेच त्याच्या जीवनाचे व्रत असते. त्यामुळे वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाचे प्राण वाचविणे हे नाथांनी खरे पुण्यकर्म मानले. म्हणूनच ते काशीची गंगेची कावड रामेश्वरावर ओतण्याऐवजी ती गाढवाच्या मुखी रिकामी करते झाले.जीवनाचा हा मार्ग मोठा अवघड आहे याची संतांना कल्पना असते. लोखंडाचे चणे खाण्याचेच हे व्रत आहे असे मुक्ताई सांगते. हे कार्य करताना आपल्याला टीकेचा मारा सोसावा लागणार आहे याची त्यांना कल्पना असते, पण तरीही या मार्गापासून विचलित व्हायचे नाही असा संतांचा निर्धार असतो, कारण
संत जेणे व्हावे, तेणे जगबोलणे सोसावे।
जग झालिया वन्ही, सन्ते सुखी व्हावे पाणी॥ हा त्यांच्या जीवनाचा मंत्र असतो. तुकाराममहाराजांना लोकांनी छळले, मीराबाईला विषाचा प्याला दिला तरी हे संत आपल्या निश्चित मार्गावरून दूर झाले नाहीत.
संतांची शिकवण होती ती धर्माची. धर्म म्हणजे कर्तव्यपालन. ज्ञानेश्वरांनी सांगितले, “आपले काम करा व त्यातच परमेश्वराचे नामस्मरण करा." म्हणून तर सावता माळी म्हणतो "कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी॥" । महात्माजींनीही या कर्तव्याचाच आग्रह धरला. त्यासाठी सत्य-अहिंसेचा मार्ग दाखविला. विनोबांनीही लोकांना दुसऱ्याचा विचार करावयास शिकविले. ज्याच्याजवळ जमीन नाही त्याच्यासाठी 'भूदान करा' असा त्यांनी उपदेश केला. पीडितांचे दुःख बाबा आमटयांनी जाणले व ओसाड माळरानावर कुष्ठपीडितांसाठी आनंदवन उभारले. त्यांच्या मनात आत्मविश्वांस फुलविला व त्यांना स्वावलंबी बनविले.
हे सारे आहेत महान संत संत कसा असावा? तर तो निरामय असावा, निरासक्त असावा, ज्ञानी, विचारवंत असावा आणि मूर्तिमंत दयानिधी असावा. अशा खऱ्याखुऱ्या संतांची आजही गरज आणि तेच खरे आपले मित्र आहेत. खऱ्याखुऱ्या साधूतच देवाची प्रचीती येत असते. म्हणूनच म्हटले आहे की
"तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा."