India Languages, asked by atharvap1090, 1 year ago

शालेचे वार्षिक ना सम्झेलन प्रसंग लेखन​

Answers

Answered by meenugoyal1234
1

काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरायला निघाले असता वेगवेगळी वेशभूषा केलेली, नटून थटून निघालेली शाळेची मुले-मुली दिसली. घराजवळच असणाऱ्या शाळेची ती मुले होती. शाळेसमोर जाताच कळाले आज त्या शाळेचे स्नेह संमेलन चालले होते आणि आज विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम चालू होता. शाळेच्या पटांगणावरून नाटकातील संवाद ऐकू येत होते. डिसेंबर, जानेवारी हे महिनेच स्नेह संमेलनाचे आणि सहलीचे. मुले या दिवसात वेगळ्याच विश्वात असतात. स्वतःतील सुप्त गुण दाखवायची ही शाळेने दिलेली नामी संधी असते प्रत्येकासाठी. मन नकळत आमच्या शालेय जीवनात गेले. आमच्या शाळेची स्नेह संमेलनाची तारीख दरवर्षी ठरलेली.. 30 डिसेंबरला विद्यार्थ्यांचा गुण गौरव व बक्षिस समारंभ, 31 डिसेंबरला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आणि 1 जानेवारीला अल्पोपहार.

स्नेह संमेलनाचे पडघम एक महिना आधीच वाजत. प्रत्येक वर्गात नोटीस फिरवून स्नेह संमेलनाची तारीख कळवली जायची. आयोजित स्पर्धांची नोटीस ऑफिसजवळच एका फळ्यावर लिहिलेली असे..वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खेळांच्या वेगवेगळ्या स्पर्धा. .सांघिक खेळ यामध्ये प्रत्येक तुकडीचा एक संघ कबड्डी, खोखो, रिले, हाॅलीबाॅल तर वैयक्तिक खेळांत धावण्याची स्पर्धा, लांब उडी, उंच उडी, भाला फेक, गोळा फेक यासारख्या स्पर्धा आयोजित करत असत.

धावण्याच्या स्पर्धां एक दिवस गावाबाहेरील माळावर(मोकळ्या जागेवर) व्हायच्या. त्यासाठी शाळेतून एक दिवस सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींना सर्व शिक्षक वृंद माळावर घेऊन जायचे. बाकी स्पर्धा शाळेच्या विस्तीर्ण पटांगणावरच होत. स्पर्धांचे दिवस भारलेले असत. वैयक्तिक खेळांत वर्ग मित्र-मैत्रिणींमध्ये असणारी स्पर्धा कबड्डी, खोखोसारख्या सांघिक खेळांत एक होऊन एकजुटीने प्रतिस्पर्धी संघाबरोबर भिडत असू. हरण्याचे दुःख, जिंकल्याचा आनंद वेगळाच असे. संघाची मुख्य म्हणून दरवर्षी कबड्डी, रिलेचे बक्षिस मुख्य अतिथींच्या हस्ते व्यासपीठावर जाऊन स्विकारतानाचा आनंद तर अवर्णनीय असे. याचवेळी आदल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात अव्वल आलेले आणि शाळे बाहेरील स्पर्धा, स्काॅलरशीपसारख्या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनाही गौरवण्यात येत असे. आपले नांव पुकारल्यानंतर आणि मित्र -मैत्रिणींच्या टाळ्यांच्या गजरात मान्यवर पाहुण्यांकडून बक्षिस घेताना कोण आनंद होत असे!!! प्रत्येकवेळी अशीच पुन्हा बक्षिसे मिळविण्याची प्रेरणाच जणू यांतून मिळत असे. कार्यक्रम संपला की, कोणाला किती बक्षिसे मिळाली, याची चर्चा करत हातात मावत नसलेली ती बक्षिसे अर्धी मैत्रिणीकडे देत, अर्धी स्वतःच्या हातात सावरत, अलवार सांभाळत घरी जाऊन आई-आबांना कधी एकदा दाखविते असे झालेले असे. ती बक्षिसे आई-आबांना दाखवल्यानंतर त्यांनी काही बोलण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील माझ्याविषयीचे कौतुक पहाणे, हेच माझ्यासाठी मोठे असायचे. ते कौतुक पाहून माझ्याच डोळ्यांत आनंदाश्रू जमा व्हायचे.

विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठीची तयारीही नोटीस ज्या दिवशी आली त्यादिवसापासूनच सुरू व्हायच्या. एखाद्या गाजलेल्या नाटकातील संवाद किंवा स्वगत, वैयक्तिक तसेच ग्रुप डांस, एखादे लहान नाटुकले.असे सर्व असे. कोणत्या गाण्यावर नृत्य बसवायचे, कोण कोण भाग घेणार, कोणी तयार नसेल तर तिला तयार करण्यासाठी तिच्या आईलाही भेटायला जायचे, गाणे पण असे निवडावे लागे ज्यासाठी वेशभूषेसाठी प्रत्येकाला सहज कपडे उपलब्ध होतील कारण तेव्हा कागलमध्ये ड्रेस भाड्याने मिळणारे दुकान वगैरे नव्हते त्यामुळे बहुतेक कोळी नृत्य, मराठी जुनी गाणी ज्यात साडीच वापरता येईल. ..आई, काकू, मावशीच्या साड्या सहज हक्काने घेता यायच्या. शाळा सुटल्यानंतर किंवा शनिवारी-रविवारी सुट्टीच्या दिवशी एखाद्या मैत्रिणीच्या घरी हा सराव चाले. बाकिचे सर्व कार्यक्रम आम्हीच बसवायचो पण नाटक मात्र सरच बसवायचे. नृत्याच्या सरावा दरम्यानची मजा-मस्ती , एकमेकींना स्टेप्स शिकवताना.जर एखादीला व्यवस्थित करता येत नसेल आणि ती वेडी वाकडी काहीतरी करत असेल तर येणारे हसू, मग तिचे लटके रागावणे, नाचातून माघार घेण्याची आम्हाला खोटी धमकी देणे मग पुन्हा तिची मनधरणी, पुन्हा तिला नव्याने समजवणे, तिच्याकडून ते करवून घेणे, हे सर्व कधीही न विसरणारे आहे.

व्यासपीठावरचे ग्रुपचे सादरीकरण, त्याला प्रेक्षकांतून येणारा टाळ्यांचा प्रतिसाद.हा इतके दिवस केलेल्या सरावाचा परमोच्च क्षण वाटे. गाणे, नृत्य आवडल्याचे शिक्षक, इतर मित्र -मैत्रिणींकडून ऐकले की होणारा आनंद वेगळाच. पण जेव्हा घरी गेल्यावर आई 'दृष्ट काढे' तेव्हा मात्र खरेच आपण सादर केलेल्या कलेची खरी पावती मिळे. या सर्व गडबडीत रात्रीचे 12 वाजून नवे वर्ष कधी सुरू व्हायचे समजायचेही नाही.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी अल्पोपहार असे. मग त्या दिवशी सुट्टी आणि 2 जानेवारीपासून आमचे नियमित वर्ग सुरू व्हायचे. पण गेल्या महिन्याभरातील ते मंतरलेले दिवस पुढील महिनाभर नेहमीच आमच्या बोलण्यात येत असत आणि मनातही सतत पिंगा घालत असत. ..आणि त्याचबरोबर पुढच्या स्नेह संमेलनाला काय काय करायचे नि कसे करायचे, याचे आडाखेही बांधले जायचे. अशा तर्‍हेने आम्ही पुढच्या स्नेह संमेलनाची वाट आधीच वर्षभरापूर्वीपासून पहायला लागायचो...खरेच ते शाळेचे सोनेरी दिवस आज खऱ्या अर्थाने miss करते आहे...

Answered by kamdarsejal77
0

Answer:

the above answer is very correct

Explanation:

true answer

Similar questions