Shetkaryachi Atmakatha
Answers
Answer:
लोकहो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हां सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. "आपला हा देश कृषिप्रधान आहे. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का, याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव..
"हल्ली खेडेगावांतून धनदांडग्यांचा, म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे. गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जबळी ठरतात.
"स्वतःचे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरीदेखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात हे शेतमजूर कसे जगतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे, याची देशवासीयांना कल्पनाही नसेल.
"या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगू दया. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू दया, एवढीच आमची मागणी आहे."