तुमच्या शाळेत राबविण्यात आलेल्या
स्वच्छता अभियानाचे वृतान्त लेखन
करा
Answers
Explanation:
स्वच्छता!” शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न रहाते. या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्यामचे मोलाचे काम शाळा करते. समृध्द भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे. “Cleanliness is next to Godliness” या महात्मा गांधीच्या घोषवाक्यानुसार मा.पंतप्रधान श्री. मोदीजींनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन ‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा केली.
यावर्षी 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छ भारत मोहीम पंधरवडा घोषीत करण्यात आला. मोदींनी ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी’ चे आवाहन केले होते. यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी या आमच्या शाळेने या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी फुलांच्या रांगोळीतून स्वच्छ भारत अभियानाचा लोगो रेखाटला. शाळेच्या फलकावर समाजजागृतीसाठी फलक लेखन करण्यात आले. विद्यार्थ्यांची चित्रामध्ये रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. प्रोजेक्टरवर स्वच्छतेविषयी माहितीपट दाखविण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली व या सर्व उपक्रमांचा व्हिडीओ तयार करुन Youtube व इतर प्रसार माध्यमांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांपर्यत पोहोचवून ‘स्वच्छ भारत अभियान’ याबाबत जाणीवजागृती करण्यात आली.
तसेच वर्षभर विद्यार्थ्यांमध्ये शौचालयाचा वापर, हातधुण्याच्या सवयी आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारुन स्वच्छताविषयक सवयीमध्ये वर्तनबदल घडुन आणण्यासाठी विविध दैनिक उपक्रम राबविले जातात. अस्वच्छ हातांमुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते म्हणून स्वच्छ हातासाठी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्व व हात धुण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या. त्यानुसार मुले वेळोवेळी जेवणाअगोदर, शौचालयावरुन आल्यानंतर, खेळानंतर साबणाने किंवा हँडवॉशने आपले हात स्वच्छ करतात. त्याबरोबर परिपाठाच्या वेळी वेळोवेळी नखे, कपडे, दात, केस इ. ची नियमितपणे पाहणी केली जाते व मार्गदर्शन केले जाते. तसेच पालक सभांमधूनही पाल्याच्या वैयक्तीक आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार पालक आपल्या पाल्याच्या स्वच्छतेची काळजी घेतात. त्याचबरोबर या सर्वांमुळे विद्यार्थ्यांनीही स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगल्या आहेत.
तसेच शालेय परिसर स्वच्छतेसाठी परिपाठाच्या अगोदर नियमितपणे शालेय परिसराची स्वच्छता केली जाते. शालेय वर्ग, शौचालय, स्वयंपाकगृह, पाण्याची टाकी इ. ची वेळोवळी स्वच्छता ठेवली जाते तिसरीच्या वर्गाच्या मराठीच्या प्रवास कच-याचा पाठाच्या आशयानुसार सर्व विद्यार्थ्यांना ओला व सुका कचरा म्हणजे काय? त्याच्या व्यवस्थापनाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. शालेय परिसरातील ओल्या व सुक्या कच-याची योग्य पध्दतीने हाताळणी केली जाते. या कच-यापासून तयार होणा-या खताचा वापर शालेय परसबागेसाठी केला जातो.
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य लसीकरण करण्यात येते. जंतनाशक गोळयांचे विद्यार्थ्यांना योग्यवेळी वाटप करण्यात येते. वृक्षरोपण, सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून शाळेचे सौंदर्य वाढवण्याचा व विद्यार्थ्यांचा स्वच्छतेतून सौंदर्याकडे याप्रकारचा दृष्टीकोन वाढवला जातो.
तसेच शाळा हा समाजाशी नाते सांगणारा घटक आहे. त्यानुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाळा व शिक्षकातर्फे गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रथमत: गावातील शौचालय नसलेल्या कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांच्या वारंवार कुटुंबभेटी घेण्यात आल्या. गुड मॉर्निंग पथक, प्रभातफेरी, मार्गदर्शन यांमधून त्यांचे उद्बोधन करण्यात आले. त्यानुसार राहिलेल्या सर्व कुटुंबानी शौचालये बांधली व त्याच्या नियमितपणे वापर करुन लागली. या सर्व प्रयत्नांमुळे गाव हागणदारीमुक्त झाले.
अशा विविध उपक्रमांमुळे आम्ही आमची शाळा ‘स्वच्छ शाळा-सुंदर शाळा’ निर्माण केली. तसेच विद्यार्थीरुपी मातीच्या गोळयाला स्वच्छतेचे बाळकडू पाजून त्यांना उज्वल भारताच्या भविष्याचे भावी सुजाण नागरीक निर्माण करण्याकडे आमच्या शाळेची वाटचाल अशीच चालू रहाणार आहे. महात्मा गांधीजीच्या, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींजीच्या स्वप्नातील स्वच्छ भारत नक्कीच साकार होणार आहे.
श्री.युवराज लक्ष्मण घोगरे
उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
विठ्ठलवाडी, केंद्र-देऊळगांवगाडा, ता.दौंड जि.पुणे