unhali sutti nibandh
Answers
Answer:
गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या वाढत्या त्रासाबद्दल आणि योग्य ती काळजी घेण्याबद्दल अनेक मेसेज वाचले. त्यावरून डोक्यात उन्हाळयाच्या सुट्टीचे विचार मनात यायला लागले. खरंतर पाऊस, पहिला पाऊस, पावसातलं प्रेम, हरवलेला पाऊस, डोळ्यातला पाऊस आणि त्यावर अनेक कवितांचा पाऊस दरवर्षी नेमाने येतो. आता इतकी सवय झाली आहे की लोकांच्या पोस्ट वाचून पावसाचा अंदाज येतो इकडे मला अमेरिकेत राहूनही. असो.
तर मुद्दा असा की पावसाबद्दल जितकं लिहिलंय मी स्वतः तितकं कधी उन्हाळ्याबद्दल लिहिलं नाहीये, किंबहुना अजिबातच नाही. म्हणून म्हटलं या सर्व आठवणींची एक पोस्ट लिहावीच. एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे या पोस्ट मध्ये 'गेले ते दिवस' असा सूर नसून 'आठवणी मांडण्याचा' विचार आहे. मला वाटते की प्रत्येक ऋतूची वेगळी एक गमंत असते ती प्रत्येकजण अनुभवत असतो. त्यासाठी लहानपणच हवे असे नाही. आताही ती येतेच, कधी मुलांचे पोहणे पाहण्यात, त्यांच्यासाठी आईस्क्रीम बनवण्यात किंवा त्यांच्या सुट्ट्या ते कसे घालवतात हे पाहण्यात. असो.
तर मला आठवणारा उन्हाळा म्हणजे परीक्षा संपल्यावरचा. तोवर परीक्षेच्या विचारांनी म्हणा किंवा अजून काय पण त्या परीक्षा संपली की उन्हाळा हे गणित डोक्यात एकदम पक्कं. तर शेवटचा पेपर टाकून घरी आलो की फार भारी फीलिंग असायचं. एकदम मोकळं मोकळं. काय करू काय नको असं व्हायचं. एकदा दोनदा तर आईने पापडाचे पीठ मळून ठेवलेलं होतं. आम्ही घरी आलो की लाटायला घेण्यासाठी. इतक्या वर्षात अजूनही माझी चिडचिड विसरले नाहीये त्यावर. दोन मोठी आकर्षणं असायची, टीव्ही आणि दुसरं पुस्तकं. टीव्हीवर फक्त दूरदर्शन त्यामुळे मर्यादितच पर्याय असायचे. पण त्यापेक्षा बरेच दिवस अभ्यासामुळे शेजारी पडूनही वाचता ना आलेलं पुस्तक बिनधास्त वाचायचं असायचं. तो त्या पहिल्या दिवसाचा उत्साह म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात होती माझ्यासाठी.
पुढे मग रोज सकाळी लायब्ररीमध्ये जाऊन दोन तरी पुस्तकं घेऊन यायची. जेवण झालं कि दुपारी वाचत बसायची हे ठरलेलं. सायकलवरून जाताना डोक्यावर तापलेलं ऊन असायचं. घरात आल्याआल्या डोळ्यासमोर अंधारीच यायची. लायब्ररीयन माझी चांगली मैत्रीणच झाली होती. वेगवेगळ्या वयात वाचलेली निरनिराळी पुस्तकं आजही आठवणीत आहेत. दुपारी घरी अनेकदा आई हाक मारायची आणि ओरडायची की उत्तर देत का नाहीस म्हणून आणि मी चिडायचे की मला ऐकूच आली नाही. इतकी त्या वाचनात गुंग असायचे. अनेकदा भाऊ-बहीण, चुलत/आते भाऊ-बहीण यांच्या सोबत खेळायचं सोडून बसायचे. स्वामी, श्रीमान योगी,पुलं, गंगाधर गाडगीळ यांची पुस्तके आणि बरेच काही वाचल्यावर, त्यात काय वाचलं हे मैत्रिणीला रोज सांगण्याची आठवणही आहे एक. त्या छोट्याशा गावातल्या लायब्ररीने खूप काही दिलं. आजही ते सोबत आहे आणि राहील.
पुस्तकं यायच्या आधी एकी खास आठवण म्हणजे आजोबांच्या सोबतची सकाळ. आम्ही आवरत असताना दारात कारंजाच्या झाडाखाली खुर्ची घेऊन आजोबा बसायचे. पेपर वाचत बसायचे. आणि दारातून सायकलवरून टोपली घेऊन जाणाऱ्या प्रत्येक माणसाला हाक मारायचे. गावठी आंबे असायचे त्यात. माणूस थांबला की आबा आम्हाला,आईला हाक मारायचे. आम्ही मग आंबा चाखून बघणार. दर वगैरे आबाच ठरवणार. कधी कधी तर आम्हाला न विचारताच घेऊन टाकायचे. मग घरात एखाद्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक डझन आंबे असायचे. लहान असताना आम्ही रोज सकाळी दात घासून एकदम आंबे खायलाच बसायचो. दुपारी जेवणातही आमरस असायचा. अर्थात त्यासाठी खास रसाचे आंबेच लागायचे. नाहीतर मग चाखून खायचे आंबेच जास्त. सुट्टी संपायला येईपर्यंत आंबे खाण्याचा उत्साह पार संपून जायचा.
आंबे सोडले तर दुसरं आकर्षण होतं ते वेगवेगळ्या कलाकुसरीचं. कापडावर धागे विणून पिशवी बनवायची, रेशमी धागे जोडून वर्तुळावर नक्षी करायची असे छोटे मोठे उद्योग आई करायला द्यायची. पण ते पूर्ण कधी केल्याचं आठवत नाहीये. एक मात्र आठवतं ते म्हणजे दारातले चमेलीचे वेल. दोन दारांच्या दोन मजल्यापर्यंत उंच गेलेले वेल होते. सकाळी उठून दार उघडलं की वाऱ्यासोबत त्याचा घमघमाट यायचा. आम्ही बहिणी आवरून फुलं वेचायच्या घाईत असायचो. का तर जास्तीत जास्त ताजी फुले गोळा करून मोठ्यातला मोठा गजरा कोण बनवणार याची स्पर्धाच असायची. बनवलेला गजरा मळून संध्याकाळी गावातच चक्कर व्हायची, कधी काकूंकडे किंवा लायब्ररीत, नाहीतर भाजी आणायला. मोगरा, चमेली आणि त्यांचे सुवास आजही उन्हाळ्याची आठवण ताजी टवटवीत करतात.
दुपारचं जेवण करून आतल्या खोलीतल्या काळ्या फरशीवर पडून टीव्ही बघायला, झोपायला भारी वाटायचं. आजही घरी गेले की त्या खोलीत डाराडूर झोप लागते. संध्याकाळी कधी कधी सायकली घेऊन शाळेच्या ग्राऊंडवर फेरी मारायला जायचो. कधी चालत जायचो. तर कधी दारातच गप्पा मारत बसायचो. संध्याकाळी दुसरं आकर्षण असायचं ते म्हणजे दारातून जाणाऱ्या आईस्क्रीमच्या गाडीचं. आबांना गाडी दिसली की ते थांबवायचेच. नाहीतर आम्ही पोरं होतोच आठवण करून द्यायला. जवळजवळ रोज स्टीलच्या छोट्या वाटीतून आवडत्या चवीचं आईस्क्रीम खायला मिळणं हा त्या काळातला सर्वात मोठा आनंद.