१) वारकरी पंथाचे कार्य तुमच्या शब्दात लिहा.
Answers
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो 'वारकरी' असे म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे,तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे,तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते; परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय. श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले.
वारकरी संप्रदायाला 'माळकरी संप्रदाय' असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे.हा संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. किंबहुना त्यास 'भागवत धर्म' असेही म्हटले जाते. भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे. ह्याच कारणासाठी पंढरपुरास 'दक्षिण द्वारका' असे संबोधण्यात येते.
वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे निर्देश श्रुतिस्मृतिपुराणांत आलेले नाहीत. विष्णुसहस्रनामांत तसेच विष्णुच्या मानल्या गेलेल्या चोवीस अवतारांत विठ्ठलाचा अंतर्भाव झालेला दिसत नाही. तथापि विठ्ठलाला इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकांपासून असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. विष्णूपासून विठ्ठल हे नाव बनले, असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. उदा., विष्णु-विष्टु-विठ्ठल असे विठ्ठल हे नाम तयार झाले, असे अनेक अभ्यासक मानतात. तथापि विठ्ठल हे विष्णूचे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते विष्णू हे 'विठ्ठल'चे (विठूचे) उद्भ्रष्ट रूप होय, असे डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे मत आहे. त्यांच्या मते विठ्ठल हा देव एकेकाळचा लोकदेव असला पाहिजे आणि तो क्रमाने कीर्तिवंत होत गेल्यानंतर त्याचे वैदिकीकरण करण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मूळ हे गोपजनीय परंपरेत आहे, असा विचार दुर्गा भागवत ह्यांनी ह्याहीपूर्वी मांडलेला आहे.
वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख प्रचारक शं. वा. उर्फ सोनोपंत दांडेकर ह्यांनी वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंथ असून वैदिक धर्माच्या तत्त्वांशी अतिशय जुळते घेणारा, असा पंथ असल्याचे म्हटले आहे. वारकरी पंथ म्हणजे सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे, अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच. तथापि तो रामाचाही उपासक आहे. द्वारका, काशी ही क्षेत्रेही वारकरी पवित्र मानतात. तसेच चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी, गोदावरी, कऱ्हा, तापी ह्या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानले आहे. शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा, कृष्णा आदी नद्यांनाही ते पवित्र मानतातच.