यावर आपले विचार लिहा
please please please give me answer please
Answers
आपणा माणसांचे सगळे विचार स्थितिज्ञान (facts), निष्कर्ष, आणि मते ह्या त्रिकूटाच्या मिश्रणांमधून तयार होत असतात, आणि कालौघात ते बदलतही असतात.
निरीक्षण/मापन/पॄथक्करण ह्या त्रिकूटावर आधारलेल्या सर्वसंमत शास्त्रीय पद्धती वापरून कोणत्याही विषयासंबंधी जमवलेली माहिती ते त्या विषयीचे स्थितिज्ञान. पर्यायी कुठल्याही स्थितिज्ञानाचा अचूकपणा कोणतीही असामी त्या शास्त्रीय पद्धती वापरून केव्हाही स्वतंत्रपणे तपासू शकते. (ह्यासंबंधी अधिक विवरण खाली परिशिष्टात दिले आहे.) कोणत्याही विषयासंबंधीच्या स्थितिज्ञानातून आपण माणसे पुष्कळदा काही ना काही निष्कर्ष काढत असतो. कोणी माणसाने काढलेले कोणतेही निष्कर्ष तात्त्विकपणॆ बरोबर असतील किंवा अजाणतेपणी चुकीचे असतील. स्थितिज्ञानातून तात्त्विकपणॆ बरोबर काढलेले निष्कर्ष "स्थितिज्ञान" ह्या गटातच घालता येतात.
आपणा माणसांची मते गुंतागुंतीच्या, पण मूलतः दोन तर्हांनी तयार होत असतात आणि काही वेळा बदलत असतात. त्या दोन मूळ तर्हा अशा :
(१) ज्या कोणा इसमांना आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने अधिकारी किंवा जाणकार मानत आसतो त्यांची किंवा आपल्या अवतीभोवतीच्या बहुसंख्य माणसांची जी काही मते असतील ती मते आपण पुष्कळदा आत्मसात करत असतो.
(२) आपली काही मते कुठल्याही तात्त्विक बैठकीवर नसून केवळ अंतर्ज्ञानाधारित (intuitive) असतात.
आपणा माणसांची काही काही मते जवळजवळ जगद्व्यापी रित्या समान असतात. उदाहरणार्थ समुद्रावर दिसणारा सूर्यास्त जवळजवळ जगद्व्यापी रित्या सगळ्या माणसांच्या मनात सुखदभावना निर्माण करतो, आणि मग आपण जवळजवळ सगळी माणसे सूर्यास्त अतिमनोहर असल्याचे विधान करत असतो. पण सूर्यास्त अतिमनोहर "असल्या"चे आपले विधान हे स्थितिवर्णन नसून केवळ एक मतप्रतिपादन असते. (उदाहरणार्थ समजा खूप मोठ्या दुःखात बुडलेल्या एकाद्या माणसाची नजर जर सूर्यास्ताकडे गेली तर त्या वेळी त्या माणसाला सूर्यास्त मनोहर न भासण्याची अगदी शक्यता आहे.) कोणत्याही परिस्थितीसंबंधी आपल्या मनातल्या प्रतिक्रिया ह्या स्थितिवर्णने नसून केवळ आपली मतप्रतिपादने असतात. पण "बहुतेक सगळ्या माणसांना सूर्यास्त मनोहर भासत असतो" हे विधान स्थितिवर्णनात्मक ठरेल, कारण त्या विधानाची सत्यता संख्याशास्त्राच्या तत्त्वांनुसार काही लोकांची तत्संबंधी मते जमा करून ठरवणे सहज शक्य आहे.
वरच्या परिच्छेदातल्या विचारांच्या किंचित विस्ताराकरता आणखी एक उदाहरण असे. : "मला खूप आनंद वाटत आहे" अशा तर्हांची आपल्या अंतर्मनासंबंधित विधाने माणसे करत असतात. पण तीही स्थितिवर्णनात्मक भासली तरी तशी नसून केवळ मतप्रतिपादनात्मक असतात. कारण माणसांच्या अंतर्मनातल्या भावनांचे शास्त्रीय मोजमाप कोणी दुसर्याने किंवा स्वतः करायची विद्या माणसाला आजमितीला अवगत नाही. "तू खूप आनंदात दिसत आहेस" हे विधानही स्थितिवर्णनात्मक भासले तरी अंशतः मतप्रतिपादनात्मक आहे. बोलणारी व्यक्ती प्रामाणिक असल्याचे धरून चालले तर "मला तू (अमुक भावना अनुभवत असल्याचे) दिसत आहेस "हा त्या वक्तव्यातला भाग थोडासा स्थितिवर्णनात्मक ठरेल, पण "तू खूप आनंदात दिसत असल्याचा" भाग मतप्रतिपादनात्मक आहे. मागच्या वाक्यात थोडासा स्थितिवर्णनात्मक असे म्हणण्याचे कारण असे की आपल्याला काय "दिसत आहे" ह्या गोष्टीचे आत्मनिरीक्षणही सरतेशेवटी "शास्त्रीय मोजमाप" वापरून आपल्याला कुठे करता येते? आपली सगळी मते आणि बरोबर/चूक निष्कर्ष ह्या गोष्टी वास्तविक स्थितिवर्णने असल्याची चुकीची कल्पना बहुतांश माणसे आपल्या मनात बाळगत असतात. ह्या वस्तुस्थितीमुळे जगात बराच लहानमोठा अनर्थ निर्माण होत असतो.
परिशिष्टे :
(१) "निरीक्षण/मापन/पॄथक्करण ह्या त्रिकूटावर आधारलेल्या सर्वसंमत शास्त्रीय पद्धती वापरून कोणत्याही विषयासंबंधी जमवलेली माहिती ते त्या विषयीचे स्थितिज्ञान. पर्यायी कुठल्याही स्थितिज्ञानाचा अचूकपणा कोणतीही असामी त्या शास्त्रीय पद्धती वापरून केव्हाही स्वतंत्रपणे तपासू शकते." अशी दोन विधाने वर दुसर्या परिच्छेदात आहेत. पण कॊणत्याही बाबीसंबंधी तशा तपासण्या करून स्थितिज्ञान प्राप्त करून घेणे हे बहुतेक सर्व जणांच्या आवक्याबाहेरचे असते, कारण निरीक्षण/मापन/पॄथक्करण ह्यांकरता लागणारा मोकळा वेळ, तंत्रज्ञान, आणि साधने ह्या सगळ्या गोष्टी अगदी मोजक्या माणसांना उपलब्ध असतात. ह्या वस्तुस्थितीमुळे आपणा बहुतेक माणसांना अनिवार्यतः कॊणा ना कोणा दुसर्यांच्या सचोटीवर आणि जाणकारीवर विश्वास ठेवून त्यांनी पुरवलेली माहिती स्थितिज्ञानात्मक आहे असे धरून चालत रहावे लागते. आपण विश्वास ठेवलेली सगळी माणसे वस्तुतः पूर्ण सचोटीची आणि त्याहून मुख्य म्हणजे पूर्ण जाणकार असतील किंवा नसतील. उघडपणे आपण विश्वास ठेवलेल्या माणसांसंबंधी आपल्याला जे अनुभव येत रहातील त्यांनुसार आपला त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढतो किंवा कमी होतो. सचोटी आणि जाणकारी ह्या दोन बाबीत माणसांचा एकमेकांवरचा बर्यापैकी विश्वास समाजचालनेला अत्यावश्यक आहे. पण त्या दोन बाबींच्या वाणीच्या वस्तुस्थितीपायी लोकांबाबतचे तारतम्य ही गोष्ट आयुष्यात खूप महत्त्वाची ठरते. वरच्या स्थितीचे एक मुख्य उदाहरण म्हणजे जगातल्या राजकीय, आर्थिक, आणि सामाजिक घटनांबाबत स्थितिज्ञान मिळवण्याकरता आपण माणसे वृत्तपत्रांवर आणि दूरदर्शनातल्या वृत्तकथनांवर विश्वास ठेवत असतो. पण काही काही वृत्तपत्रे आणि दूरदर्शनसंस्था बातम्या देताना बातम्यांमधे जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी आपल्या मतांचेही कमीजास्त मिश्रण करत असतात.
(२) काही वेळा काही माणसे काही विधाने करताना आपण केवळ स्थितिज्ञान प्रकट करत आहोत हे जोरकसपणॆ सांगण्याकरता "वस्तुस्थिती अशी आहे की..." अशा तर्हेचे शब्द वापरत असतात. पण कोणी तसे म्हटले तरी त्या असामीचे ते विधान वस्तुस्थितीनिदर्शक असेल किंवा नसेलही