लो. टिळकांची चतु:सूत्री सांगा?
Answers
Explanation:
लाल, बाल, पाल या जहालमतवादी नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जो आंदोलनात्मक संघर्षाचा मार्ग स्विकारला त्यामध्ये स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्री चा समावेश होता.
(अ) स्वराज्य : लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरला. स्वराज्याचा अर्थ परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून मुक्ती असा सामान्यत: घेण्यात येतो. परंतु स्वराज्या इतकाच मर्यादित अर्थ टिळकांना अभिप्रेत नव्हता. स्वराज्य ही एक नैतिक राष्ट्रीय आवश्यकता आहे, या दृष्टिकोणातून स्वराज्याकडे पाहिले पाहिजे असे टिळकांचे मत होते. भारतीय संस्कृतीच्या सांस्कृतिक मूल्यांशी ‘स्वराज्य’ हा शब्द संबंधित आहे. अशी टिळकांची धारणा होती. स्वराज्य म्हणजे आपले राज्य. प्रजेच्या प्रतिनिधीमार्फत चालणारे राज्य, ब्रिटिशांच्या राज्यास स्वराज्य कधीच म्हणता येणार नाही, असे टिळकांचे मत होते. कारण राज्यकर्ते परधर्मी व परदेशी आहेत. त्यांचे हितसंबंध त्यांच्या स्वत:च्या देशात गुंतलेले आहेत. स्वराज्याचा ‘प्रजासत्ताक राज्य’ हा अर्थ त्यांनी लोकांच्यापर्यंत पोहचवला.
(ब) स्वदेशी : भारतात तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर भारतीयांनी करावा आणि भारताबाहेर जाणाऱ्या पैशाचा ओघ स्वदेशी माल वापरून थांबवावा ही स्वदेशीची संकल्पना होती. स्वदेशीमुळे खेड्यातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळेल व त्यांचा विकास होईल. राजकीय, औद्योगिक, सामाजिक, नैतिक व सांपत्तिक या सर्वच दृष्टीने स्वदेशीची चळवळ आवश्यक आहे, असे टिळकांचे मत होते.
(क) बहिष्कार : बहिष्कार म्हणजे कोणतीही विदेशी वस्तू न वापरणे होय. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून त्याद्वारे ब्रिटिशांची आर्थिक व्यवस्था खिळखिळीत करणे. शिवाय ब्रिटिशांना प्रशासनात असहकार्य करुन आडवणूक करणे.
(ड) राष्ट्रीय शिक्षण : ब्रिटिश शिक्षणपद्धती त्रि:सत्व, ध्येयशून्य आहे, ती फक्त कारकून तयार करते असे टिळकांचे मत होते. भारतातील शिक्षणपद्धती लॉर्ड मेकॉलेने सुरू केली होती व ती भारतीयांच्या विचारांशी सुसंगत नव्हती म्हणून राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी देशभर शाळा, महाविद्यालये उघडण्याची योजना मांडण्यात आली. यातून भारतीय संस्कृतीशी व मूल्यांशी सुसंगत असे शिक्षण देण्यात यावे असा उद्देश होता. राष्ट्रीय शिक्षणामुळे राजकीय व सामाजिक जाणीव निर्माण झाली पाहिजे. स्वत:च्या पायावर उभा राहणारा देशाभिमानी तरुण निर्माण झाला पाहिजे असे टिळकांचे मत होते.