India Languages, asked by imfiya7, 4 months ago

swapnatil ghar nibandh​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

गर्द हिरव्या झाडांच्या आड लपलेलं, माड, पोफळी, फणस, जाम, उंबर,आंबा यांनी वेढलेलं, दारासमोर सळसळता पिंपळ असलेलं, बकुळ, सुरंगी, सोनचाफा, प्राजक्त यांनी सुगंधित केलेलं नि कौलांवर चढलेल्या वेलींनी शोभा आणलेलं एखादं जुनं कौलारू घर देवानं माझ्या नशिबी का लिहून ठेवलं नाही या विचारांनं मी उदास होतो. पावसाचा वर्षाव होऊ लागला की पन्हळींतून पागोळ्या अंगणात कोसळू लागतात नि वृक्षवल्लींना नवी टवटवी येते, वसंतात पर्णफुलांना बहर येतो, आंब्याच्या फांद्या मोहरानं लवतात, हे सगळं मी पुस्तकातच वाचायचं का? माझे गोमंतकीय कविमित्र मनोहर नाईक ऊर्फ ’नाना’ आपल्या एका कवितेत म्हणालेत :

“अपर्ण होउन चाफा येतो कळ्याफुलांनी भरून,

जरठ म्हणावे काय तयाला काय म्हणावे तरूण?

आतुन तरु रसवंत राहता पतझडिची का खंत ?

शिशिर असो वा वसंत त्याला ऋतु सगळेच पसंत”.

तो अपर्ण असूनही फुलत गेलेला चाफा माझ्या अंगणात असता तर मी किती हर्षित झालो असतो. शहरात जन्मलो, शहरात वाढलो, उरलेलं आयुष्य शहरातच काढावं लागणार यात काय मजा आहे? गर्द रुखावळ असावी, घनदाट हिरवाईनं डोळे सुखवावेत, पाखरांचा किलबिलाट अव्याहत कानांवर पडावा, कोकीळ मधेच साद देऊन जावा, परसदारच्या विहिरीकडून रहाटाचा आवाज यावा, हे सगळं अनुभवायला पूर्वजन्मीचं पुण्य हवं जबरदस्त. ग.दि.मादगुळकरांच्या एका काव्यात ओळ आहे

” गवत उंच दाट दाट, वळत जाय पायवाट

वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे”.

कविवर्य नानांनीही म्हटलंय:

“माघ फाल्गुन खेळती वृक्ष वेलींसवे होरी

रंग झळाळती लाल निळे पिवळे केशरी”.

असा सर्व निसर्ग घराभोवती सजलेला. या घराला गच्ची नसते, गॅलरी नसते, पण अंगण असतं, पडवी असते, सोपा असतो, माजघर असतं, परस असतो. परसात विहीर असते. शेजारपाजारच्या ललना रहाटाने पाणी ओढतात. त्यांच्या कंकणाचा ध्वनी कानांना सुखवून जातो. घराला कडी- कोयंडा नसतो. कुणीही यावं, पडवीत क्षणभर बसून सुखदु:खाचे चार शब्द बोलावेत. पाहुण्यानं अचानक यावं. अगोदर कळवून यायची काय गरज? आल्यागेल्याचं स्वागत घर आनंदानं करतं. असं घर शहरात मिळेल काय? शहरात असतात ते उंच उंच सिमेंट-कॉंक्रीटचे टॉवर्स, ज्यांना शीतलतेचा स्पर्शही होत नाही. त्यासाठी पंखे किंवा वातानुकूल यंत्रे बसवावी लागतात. अंगणातून हळूच आत शिेरून, घरभर हिंडून, परसदारातून पसार होणारी वा-याची झुळूक या शहरी घरांच्या नशिबात नाही. ती खेडयातल्या घरानंच अनुभवावी.

पण एक गोष्ट मात्र खरी. घराला घरपण येतं ते या गोष्टींनी नव्हे. त्यात प्रेमरज्जूंनी एकमेकांना बांधलेली माणसं असावी लागतात. धाक नि प्रेम यांचं मिष्रण असलेले वडील, मायेचा वर्षाव करणारी आई, सदरा नि अर्धी चड्डी घालून थोरल्या भावाकडे श्रद्धायुक्त नजरेनं पाहणारा शाळकरी भाऊ नि फ्रॉक घालून दुडुदुडु धावणारी बोबडी, निरागस छोटी बहीण. एखादे प्रेमळ आजोबा नाहीतर नातवांची बाजू घेऊन इतरांशी तंडणारी प्रेमळ आज्जी. माहेरला आलेली एखादी मावशीसुद्धा. तेव्हांच ते घर पूर्ण होतं.

पण हे सगळं बंदिस्त घराबद्दल झालं. नारायण सुर्वे आपल्या एका कवितेत म्हणतात :

“दिवसभर तापलेल्या फूटपाथवर रात्री आम्ही पथाऱ्या सोडतो

म्हणजे काय की , जिन्याखाली खोवून ठेवलेली गोणपाटं उघडतो”.

मुंबईसारख्या बकाल शहरात हजारो बेघर जीव फूटपाथवरच संसार मांडतात. तिथंच राहतात, जगतात, मरतात सुद्धा. त्यातला एखादा दूर कुठंतरी कामावर जातो तेव्हा त्याला आठवण कुठल्या घराची येत असेल? कुठल्या घराची ओढ त्याला वाटत असेल? फूटपाथवरच्या उघडया घराची? हो, त्याचीच की, आणखी कुठल्या? तिथं त्याची प्रेमाची बाईल नि नागडीउघडी पोरं त्याची वाट बघत असतील उपाशीपोटी. अशा माणसाला वाटेत कुणीतरी विचारल, “कुठं निघालास रं?” तर तो “घराकडं जी” असंच उत्तर दईल नं त्याला?

मला आवडतं तसं घर माझ्या पूर्वजांनी कुठल्यातरी खेडयात बांधून ठेवलं नाही म्हणून उदास व्हायच्या ऐवजी मी नको का बांधायला होतं असं एखादं घर? मला ते आयुष्यात जमलंच नाही. मी ते फक्त स्वप्नातच पाह्त बसलो. अजूनही पाह्तो. ते दगडमातीचं आहे. त्याला माडांच्या झावळ्यांनी सावली दिलीय त्याचं दार सदैव उघडं असतं म्हणून त्याला डोअर बेलच नाही. दारातला प्राजक्त रोज पहाटे पांढरा सडा घालतो. घरात शांतता नांदतेय. सोप्यात झोपाळा टांगलाय. त्यावर बसून हलकेच झोके देत आई तांदूळ निवडतेय. तिचे थकलेले डोळे सतत वाटच बघतायत. बाबांची, आम्हा मुलांची, मावशीची. तिच्या माहेरच्या माणसांची. वाट बघण्यातच तिचं आयुष्य सरतंय. तशीच माझ्या मुलांची आईदेखील. स्त्रियाच घराला खरं घरपण देतात. एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे. ते माझ्या मनात रुतून बसलंय. ” मेन मेक हाउसिस, वीमेन मेक होम्स ” (पुरूष घरं बांधतात, स्त्रिया घरकुलं). स्त्रिया नसत्या तर बाळाला जीवनदान देणारी आई नसती, “अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं, रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीट्टा.” म्हणत जोजवणारी आजी नसती, ’माय मरो मावशी जगो’ ही म्हण सार्थ करणारी मावशी नसती, माझ्याशी वाद घालणारी नि मधेच खुदकन हसणारी बहीण नसती, आणि “बाबा” म्हणत माझ्या गळ्यात पडणारी माझी स्वत:ची चिमणीही नसती. म्हणजे काय, घर असून नसल्यासारखंच असतं की. घरची ओढ ही भावना निर्माण केली स्त्रियांनीच. त्यांचे आपण ऋणी राहायला हवं की नको?

माझे परममित्र नाना – ज्येष्ठ गोंमंतकीय कवी मनोहर नाईक – पेडण्यात राहतात. त्यांचं तिथं रुखावळीनं वेढलेलं सुंदर कौलारू घर आहे. त्यात मी महिनोन् महिने जाऊन राहिलोय लेखन-वाचन करण्यासाठी. त्यांची ’रानातले घर’ ही कविता सदैव माझ्या मनात रुंजी घालत असते. ते म्हणतात, ” दोन्ही हातांनी वाटावे असं देण्याची माझ्या घराची दानत आहे.

“माझे गोव्यातील घर असे रानात नांदते

आल्या गेल्या पाहुण्याला घट्ट प्रेमाने बांधते”.

असं सुंदर घर मी स्वप्नात बांधलंय. केव्हांपासून त्यातच राहतोय नं मी !

Similar questions